शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! पावसामुळे सत्र परीक्षा बुडाल्यास विद्यार्थ्यांना देता येईल पुनर्परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

exam
शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! पावसामुळे सत्र परीक्षा बुडाल्यास विद्यार्थ्यांना देता येईल पुनर्परीक्षा

शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! पावसामुळे सत्र परीक्षा बुडाल्यास विद्यार्थ्यांना देता येईल पुनर्परीक्षा

सोलापूर : दिवाळीपूर्वी पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा घेतली जात आहे. पण, परतीच्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, मुलांना शाळेत यायला अडचणी आहेत. त्यामुळे आजारी असल्याने किंवा अतिवृष्टीमुळे सत्र परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनीही माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना तशा सूचना केल्या आहेत.

कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद राहिल्या होत्या. १५ जूनपासून आता शाळा नियमित सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकांकडून सराव चाचणीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच दिवाळीपूर्वीची सत्र परीक्षा १९ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. त्यानंतर २० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत शाळांना दिवाळी सुट्या आहेत. परंतु, करमाळा, माढा, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर अशा तालुक्यांमध्ये परतीचा पाऊस जोरात पडत आहे. सीना, भीमा या नद्या दुथडी भरून वाहत असून ओढे-नालेही तुडुंब भरले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, वाड्या-वस्त्यांवरील मुलांना पाण्यामुळे शाळेत येता येत नाही. परीक्षा बुडेल म्हणून काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेला येण्याचा प्रयत्न करीत असल्याची स्थिती आहे. पालकांनाही मुलांच्या परीक्षेची चिंता आहे. पण, मुलांनी व पालकांनी परीक्षेची चिंता न करता पावसामुळे परीक्षा बुडाली, तर त्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणाले...

माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून दिवाळीपूर्वीची सत्र परीक्षा घेतली जात आहे. पण, मागील दोन-चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी, जेणेकरून कोणाचेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी मुख्याध्यापकांना केल्या आहेत.

शाळा अन्‌ विद्यार्थी स्थिती

  • प्राथमिक शाळा

  • ३,१२८

  • विद्यार्थी संख्या

  • २.८७ लाख

  • माध्यमिक शाळा

  • १,०८७

  • विद्यार्थी संख्या

  • ३.४९ लाख

मुख्याध्यापक, शिक्षकांनी मुलांना सक्ती करू नये

तालुक्यात किंवा संबंधित गावात मुसळधार पाऊस पडत असल्यास परिस्थितीचा अंदाज घेऊन संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे. गटशिक्षणाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊन मुख्याध्यापक शाळेला सुटी देऊ शकतात. पावसामुळे शाळेत येण्यास अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक तथा शिक्षकांनी सक्ती करू नये. आपत्कालीन परिस्थितीत घेतलेल्या सुटीतील शैक्षणिक कामकाज पुन्हा भरून काढू शकतात, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.