esakal | रविवारी येणार ऑक्‍सिजन एक्‍स्प्रेस सोलापुरात ! विशाखापट्टणमशी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen express

रविवारी येणार ऑक्‍सिजन एक्‍स्प्रेस सोलापुरात ! विशाखापट्टणमशी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा सुरू

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील दोन हजार 700 हून अधिक रुग्णांना ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे रुग्णालयांना ऑक्‍सिजन कमी पडू नये म्हणून रिकाम्या सिलिंडरमध्ये ऑक्‍सिजन भरून ठेवला जात आहे. मात्र, रिकाम्या ऑक्‍सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागल्याने ऑक्‍सिजन घेऊन आलेल्या टॅंकरला तासन्‌तास थांबावे लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे आता साखर कारखान्यांसह अन्य उद्योगांकडील रिकामे ऑक्‍सिजन सिलिंडर जमा करून घेतले जात आहेत.

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), मार्कंडेय, अश्‍विनी, यशोधरा अशा मोठ्या रुग्णालयांना ऑक्‍सिजन कमी पडू नये म्हणून प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. दुसरीकडे, ज्या लहान दवाखान्यांकडे ऑक्‍सिजनचे टॅंक नाहीत, त्यांना सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्‍सिजन पुरवला जात आहे. मात्र, ऑक्‍सिजनची भागवाभागवी सुरू असतानाच रिकामे सिलिंडर नसल्याने सोलापुरात आलेल्या टॅंकरला काही तास जागेवरच थांबून राहावे लागत आहे. त्यामुळे साखर कारखाने आणि अन्य उद्योगांकडून सुमारे दोनशे सिलिंडर जमा करून घेतले जात आहेत. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना साखर कारखान्यांकडील रिकामे सिलिंडर जमा करून घेण्याचे काम निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी सोपविले आहे.

हेही वाचा: जिल्ह्यातील 87 हजार 98 रुग्ण झाले बरे ! आज 1719 वाढले; 42 रुग्णांचा मृत्यू

रिकामे सिलिंडर जमा करण्याचे काम सुरू

सध्या जिल्ह्यातील अडीच हजारांहून अधिक रुग्णांना ऑक्‍सिजन दिला जात आहे. दहा हजारांहून अधिक रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज भासल्यास मागणी वाढते. आता ऑक्‍सिजनची भागवाभागवी सुरू असून रिकामे ऑक्‍सिजन सिलिंडर कमी पडत असल्याने साखर कारखान्यांसह अन्य उद्योगांकडील रिकामे सिलिंडर जमा करून घेतले जातील.

- भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर

दोन दिवसांत येणार ऑक्‍सिजन एक्‍स्प्रेस

सध्या शहर- जिल्ह्यात साडेअकरा हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील तीन हजारांपर्यंत रुग्णांना ऑक्‍सिजन लागतोय. विशाखापट्टणम येथून ऑक्‍सिजन एक्‍स्प्रेस दोन दिवसांत सोलापुरात दाखल होणार आहे. त्यातून सोलापूर शहर- जिल्ह्याची गरज पाहून दोन टॅंकर मिळतील, असा विश्‍वास जिल्हा प्रशासनाने व्यक्‍त केला आहे. तर टॅंकरद्वारे थेट विशाखापट्टणमहून ऑक्‍सिजन आणता येईल का, यादृष्टीने देखील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे विशाखापट्टणम येथील प्रशासनासोबत चर्चा करीत आहेत. ऑक्‍सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अजूनही पुरवठा सुरळीत न झाल्याने प्रशासनाकडून ऑक्‍सिजनची भागवाभागवीच सुरू आहे.

loading image
go to top