शिक्षणाधिकाऱ्यांनी भरला दम!...तर 'अतिरिक्त'ची सेवासमाप्ती अन्‌ शाळांमधील पदे करणार रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा
शिक्षणाधिकाऱ्यांनी भरला दम!...तर 'अतिरिक्त'ची सेवासमाप्ती अन्‌ शाळांमधील पदे करणार रद्द

शिक्षणाधिकाऱ्यांनी भरला दम!..तर 'अतिरिक्त'ची सेवासमाप्ती अन्‌ शाळांमधील पदे करणार रद्द

सोलापूर : जिल्ह्यातील खासगी अनुदानित प्राथमिक शाळांवरील ९८ शिक्षक अतिरिक्त झाले होते. ऑगस्टमध्ये त्यांचे समायोजन करूनही ३७ शाळांनी शिक्षकांना सामावून घेतले नाही. दुसरीकडे, काही शिक्षक ग्रामीणमधील शाळांवर हजर झालेले नाहीत. मंगळवारपर्यंत त्या शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून न घेतल्यास त्यांच्याकडील मंजूर पद रद्द आणि शिक्षक संबंधित शाळेत न गेल्यास त्यांच्यावर सेवासमाप्तीची कारवाई केली जाणार आहे.

खासगी व शासकीय शाळांमध्ये पटसंख्या टिकविण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याची स्थिती आहे. पटसंख्या कमी झाल्याने दरवर्षी काही शिक्षक अतिरिक्त होतात. जिल्ह्यातील ९८ शिक्षक अतिरिक्त झाले असतानाही त्यांना शासनाकडून दरमहा वेतन दिले जात होते. अशा परिस्थितीत ऑगस्ट २०२२ मध्ये त्या सर्वांचे समायोजन केले.

ज्या शाळांमध्ये पदे रिक्त आहेत, अशा ठिकाणी त्यांचे समुपदेशनाने समायोजन करण्यात आले. शासनाच्या निकषांनुसार संबंधित शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना समावून घेणे आणि त्या शिक्षकांनी संबंधित शाळांवर हजर होणे बंधनकारक आहे. त्यानुसार मागील साडेचार महिन्यांत ९८ पैकी ६१ शिक्षक त्या त्या शाळांवर हजर झाले. मात्र, ३७ शिक्षकांपैकी ३४ शिक्षकांना संबंधित शाळांनी अद्याप हजर करून घेतलेले नाही. तर तीन शिक्षक त्यांना मिळालेल्या शाळांवर गेलेले नाहीत. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी त्यांची सुनावणी घेतली आहे. मंगळवारपर्यंत आदेशानुसार कार्यवाही न झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

शाळांचे पद होणार अपव्यगत

अतिरिक्त शिक्षकांना समावून घ्या, असे आदेश असतानाही मागील साडेचार महिन्यांत ३४ शाळांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केलेले नाही. त्यांना मंगळवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शासनाचा आदेश न पाळणाऱ्या शाळांमधील मंजूर पद रद्द (अपव्यगत) केले जाईल. तर जे शिक्षक संबंधित शाळेवर रुजू झालेले नाहीत, त्यांचे वेतन थांबवून त्यांच्या सेवा समाप्तीचा प्रस्ताव शासनाला (उपसंचालक) पाठविला जाणार अल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

शासन नियमांनुसार हवी कार्यवाही

खासगी प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे ऑगस्टमध्येच समायोजन करण्यात आले आहे. तरीसुद्धा काहीजण संबंधित शाळेवर हजर झालेले नाहीत. तर काही शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतलेले नाही. त्यांना मंगळवारपर्यंत मुदत दिली असून, त्यानंतर ठोस कारवाई केली जाईल.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर