esakal | लस घेतल्यानंतर पाळा "हे' नियम ! दुसरा डोस घ्या आठ आठवड्यांतच
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

लस घेतल्यानंतर पाळा "हे' नियम ! दुसरा डोस घ्या आठ आठवड्यांतच

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांतच घेणे गरजेचे आहे. मात्र, अनेकजण दोन महिन्यांनंतर लस टोचण्यासाठी येत असल्याने त्यांना लस द्यायची की नाही, याबाबत प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. तत्पूर्वी, आधार कार्ड अपडेट नसलेल्यांसाठी दुसरा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे लस टोचायला आलेल्या कोणत्याही व्यक्‍तीला हाकलून देऊ नये, अन्यथा संबंधित लसीकरण केंद्रांवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

आतापर्यंत 35 हजार 366 वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली, परंतु त्यातील 20 हजार 572 कर्मचाऱ्यांनी अजूनपर्यंत दुसरा डोस घेतलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आठ हजार 373 अधिकारी व कर्मचारी लसीचा पहिला डोस घेतला असून त्यातील 68 टक्‍के कर्मचारी दुसऱ्या डोससाठी केंद्रांवर फिरकलेच नाहीत, असे लसीकरणाच्या अहवालातून समोर आले आहे. तसेच महसूल विभागातील सात हजार 716 कर्मचाऱ्यांनी पहिला तर त्यापैकी अवघ्या एक हजार 922 जणांनीच दुसरा डोस घेतला आहे. अन्य शासकीय विभागांमध्ये फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या 14 हजार 964 कर्मचाऱ्यांपैकी तीन हजार 974 जणांनीच दुसरा डोस घेतला आहे.

हेही वाचा: कोरोना पॉझिटिव्ह शिक्षकांना आता दोन महिन्यांची सुट्टी !

45 वर्षांवरील शहर-जिल्ह्यातील 66 हजार 292 नागरिकांनी तर 60 वर्षांवरील 89 हजार 989 ज्येष्ठांनी लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे. दुसरा डोस टोचून घेणाऱ्यांचे प्रमाण मात्र साडेसहा टक्‍केदेखील नाही. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना होत नाही, असा अनेकांना समज झाला आहे. मात्र, त्यांनी सहा ते आठ आठवड्यात दुसरा डोस घेणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यासाठी आतापर्यंत दोन लाख 81 हजार 530 कोविशिल्डचे तर दोन हजार 640 कोव्हॅक्‍सिन लसीचे डोस मिळाले आहेत.

हेही वाचा: सोशल मीडिया ठरतोय घबराटीचे मूळ कारण ! निधन वार्ता, चुकीच्या माहितीचा भडिमार

जिल्ह्यातील लसीची स्थिती...

  • एकूण प्राप्त डोस : 2,84,170

  • लसीकरणाची केंद्रे : 185

  • पहिला डोस घेतलेले : 2,22,032

  • दुसरा डोस घेतलेले : 34,404

लसीचा पहिला डोस घेतलेल्यांनी सहा ते आठ आवड्यांतच लसीचा दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे. परंतु, अनेकजण दोन महिन्यांनंतर येत आहेत. दुसरीकडे लसीकरण केंद्रांवर लस टोचायला आल्यानंतर आधार अपडेट नाही म्हणून कोणालाही परत पाठवू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. मागणीच्या प्रमाणात लस मिळत नसल्याने केंद्रे वाढविण्याचे नियोजन असतानाही वाढवता येत नाहीत.

- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा समन्वयक, कोरोना लसीकरण, सोलापूर

लस टोचलेल्यांनी पाळावेत "हे' नियम...

  • पहिला डोस घेतल्यानंतर गर्दीत जाऊ नये, दूरचा प्रवास टाळावा

  • लस घेतल्यानंतरही मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावेच लागेल

  • लस घेण्याच्या दोन आठवडे व लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यांपर्यंत मद्यपान करू नये

  • पहिला डोस टोचून घेतल्यानंतर कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांतच घ्यावा

  • दोन महिन्यांपूर्वीच दुसरा डोस घ्यावा; पहिला डोस ज्या लसीचा घेतला, त्याच लसीचा दुसरा डोस घेणे क्रमप्राप्त

loading image
go to top