दारु पिऊन त्रास देणाऱ्या बापाचा मुलानेच केला खून! पळून जाताना रेल्वे स्टेशनवर पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News
दारु पिऊन त्रास देणाऱ्या बापाचा मुलानेच केला खून! पळून जाताना रेल्वे स्टेशनवर पकडले

दारु पिऊन त्रास देणाऱ्या बापाचा मुलानेच संपविले! पळून जाताना रेल्वे स्टेशनवर पकडले

सोलापूर : दारू पिऊन आईसह कुटुंबातील सदस्यांना त्रास देणाऱ्या वडिलांच्या डोक्यात फरशी घालून मुलानेच खून केला. एमआयडीसी परिसरातील किर्ती नगरात रविवारी (ता. २३) मध्यरात्री घडली. आकाश बसवराज गवंडी (वय २२) याला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले. आज (मंगळवारी) त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

संशयित आरोपी आकाश व त्याचे वडिल बसवराज लक्ष्मण गवंडी हे दोघेही ठेकेदाराकडे मिस्त्री म्हणून कामाला जात होते. मयत बसवराज यांना दारूचे व्यसन होते. आकाश हा देखील मद्यपान करायचा. रविवारी (ता. २३) घरी दोघेच होते. जेवण करून झोपल्यानंतर आकाशने मध्यरात्री फरशी त्यांच्या डोक्यात घातली. त्यात बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आकाश रात्रभर मयत बसवराज यांच्याजवळच झोपी गेला. सोमवारी (ता. २४) पहाटेच्या सुमारास आकाश उठला आणि त्याने ठेकेदाराकडून ६०० रुपये घेतले. त्यानंतर त्याने थेट रेल्वे स्टेशन गाठले. हुबळी एक्स्प्रेसमधून विजयपूरला जाण्यासाठी त्याने तिकीट काढले आणि रेल्वेत जाऊन बसला. पण, एमआयडीसी पोलिसांना खूनाची वार्ता समजताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आकाशला रेल्वे सुटण्यापूर्वीच ताब्यात घेतले.

वडिलांच्या मोबाइलमुळे सापडला

वडिलांचा खून करून विजयपूरला पळून जाण्याच्या तयारीत असलेला आकाश हा हुबळी एक्स्प्रेसमध्ये बसला होता. वडिलांचा मोबाइल घेऊन तो निघाला होता. पोलिसांनी ‘सायबर’च्या मदतीने त्याचे लोकेशन तपासले. रेल्वे स्टेशनवर तो असल्याची खात्री होताच एमआयडीसी व शहर गुन्हे शाखेचे पथक तात्काळ त्याठिकाणी पोहचले. रेल्वे सुटायला अवघे काही मिनिटे शिल्लक असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

मामांकडे गेले होते आई व लहान भाऊ

आकाशचा लहान भाऊ इयत्ता बारावीमध्ये शिकतो. वडिलांच्या सततच्या त्रासाला कंटाळून तो लहानपणापासूनच मामाकडे राहायला होता. दिवाळीनिमित्त आकाशची आईदेखील माहेरी गेली होती. दिवाळीसाठी केलेले पदार्थ घेऊन आकाशची आई व भाऊ सोमवारी (ता. २४) सोलापुरात आले होते. पण, त्या दिवशी हा प्रकार त्यांना दिसला आणि त्यांच्या पायाखालील जमीनच सरकली.