'शिक्षणापेक्षा पोट महत्त्वाचं आहे साहेब! पोटासाठी करावं लागतं...' | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'शिक्षणापेक्षा पोट महत्त्वाचं आहे साहेब! पोटासाठी करावं लागतं...'
'शिक्षणापेक्षा पोट महत्त्वाचं आहे साहेब! पोटासाठी करावं लागतं...'

'शिक्षणापेक्षा पोट महत्त्वाचं आहे साहेब! पोटासाठी करावं लागतं...'

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे :

किल्लारी परिसरातून रोजगारासाठी कासेगाव (ता. पंढरपूर) येथे अनेकजण आपल्या कुटुंबीयांसमवेत येत असतात.

सांगोला (सोलापूर) : 'पोटासाठी गावो-गावं हिंडावं लागतं, पोरगं अन्‌ सून दुसऱ्याच्या बागेत अंगावर काम घेवून राबतेती. आम्हासन्ही शेत वगैरं काय नायं. मी नातवंडांना घेऊन बागेकडलां बसते. आमचं कसं तर होऊ द्या, पण या लेकरा बाळांसाठी, पोटासाठी करावं लागतं...' सात महिन्याच्या नातवाला कामावरील मालकाच्या द्राक्ष बागेतच झोपाळा करून खेळवणारी लातूर (Latur) जिल्ह्यातील किल्लारी (Killari) भागात राहणाऱ्या लक्ष्मीबाई कांबळे आपल्या जीवनाची व्यथा सांगत होत्या.

हेही वाचा: सोलापूरकरांना पडला 'एसएमएस'चा विसर! कोरोनाला आमंत्रण देण्याचाच प्रकार

किल्लारी परिसरातून रोजगारासाठी कासेगाव (ता. पंढरपूर) येथे अनेकजण आपल्या कुटुंबीयांसमवेत येत असतात. कासेगाव परिसरात द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच शेजारील सांगोला तालुक्‍यात द्राक्षांसह डाळिंब बागांची विविध प्रकारची कामे हे मजूर करत असतात. द्राक्ष बागेतील छाटणी करणे, पेस्ट लावणे, काढी बांधणी, फेल-फुट काढणे, द्राक्ष-डाळिंब बागांचा माल काढणे आदी कामे हे मजूर करत असतात. रोजंदारीपेक्षा झाड संख्येवर तसेच कामाच्या प्रकारावर हे मजूर कामे घेत असतात. यासाठी एका मुकादमाची नेमणूक करण्यात आलेली असते. परिसरात अशा बागांच्या कामासाठी या मजुरांना मोठी मागणी आहे. या मुजरांची संख्या जास्त असल्याने शेतकऱ्यांचीही कामे ताबडतोब होत असल्याने या मजुरांना मोठी मागणी वाढत आहे.

लक्ष्मीबाई कांबळे याही आपल्या मुलगा, सून यांच्याबरोबर रोजंदारीसाठी येथे आलेल्या आहेत. मुलगा व सून रोजंदारीसाठी दुसऱ्याच्या बागेत काम करत असताना त्यांच्या सात महिन्याच्या लहान नातवाला व इतर मुलांना घेऊन त्या बागेजवळच कोठेतरी सावलीत बसून सांभाळ करीत असतात. त्यांच्याकडे शेतजमीन नसल्याने त्यांच्या मुलाबाळांना मजुरी केल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्या सांगतात.

शिक्षणापेक्षा पोट महत्त्वाचं...

किल्लारी परिसरातून अनेक कुटुंबच कामासाठी या भागात येतात. आई-वडीलच रोजंदारीसाठी फिरत असल्याने त्यांच्यासमवेत त्यांच्या लहान मुलांनाही यावे लागते. परंतु शिक्षण घेण्याच्या वयातच लहान मुलांना आपल्या आई- वडिलांच्या पाठीमागे फिरावे लागते. मुलांच्या शिक्षणाबाबत या मजुरांना विचारले असता 'शिक्षणापेक्षा पोट महत्त्वाचं आहे साहेब' असे ते आवर्जून सांगतात.

हेही वाचा: राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक अशक्‍य! गटातटात लढतीची शक्‍यता

शैक्षणिक धोरणाचे काय?

कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध शैक्षणिक धोरणं अमलात आणली आहेत. कोरोनासारख्या महामारीच्या काळातही ऑनलाइन शिक्षण पद्धतीची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याचे सांगताहेत. परंतु पोटासाठी असे गावोगाव, परजिल्ह्यात फिरणाऱ्या या कुटुंबासमवेत मुलांच्या शिक्षणाचे काय? ही मुले शिक्षणापासून वंचित तर राहणार नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होतो.

loading image
go to top