esakal | काळजी घ्या ! डेंग्यूचा वाढतोय फैलाव; दीड महिन्यात 40 पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue

काळजी घ्या! डेंग्यूचा वाढतोय फैलाव; दीड महिन्यात 40 पॉझिटिव्ह

sakal_logo
By
वेणुगोपाळ गाडी

शहर आणि परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून, गत दीड महिन्यात डेंग्यूचे तब्बल 40 रुग्ण आढळले आहेत.

सोलापूर : शहर आणि परिसरात डेंग्यूचा (Dengue) प्रादुर्भाव वाढला असून, गत दीड महिन्यात डेंग्यूचे तब्बल 40 रुग्ण आढळले आहेत. खासगी दवाखान्यात डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची गर्दी वाढत चालली आहे. महापालिकेकडून डेंग्यूबाबत सर्व्हे करण्यात येतो. याअंतर्गत डेंग्यू संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येतात. घरात आजारी असलेल्या वा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन सर्वोपचार रुग्णालयातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. त्यातून संबंधित रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, याचा अहवाल प्राप्त होतो. रुग्ण राहात असलेल्या परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून फवारणी केली जाते. शहरात जूनपासून आजतागायत म्हणजे दीड महिन्यात 183 संशयितांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले असता, त्यापैकी 40 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. महापालिकेकडून शहरात डेंग्यूविषयक कंटेनर सर्वेक्षणासाठी 20 तर फवारणीसाठी 81 कर्मचारी आहेत. (The spread of Dengue is on the rise and in two months forty people have tested positive-ssd73)

हेही वाचा: सदस्यांनाच माहिती नाही झेडपीचा अधिनियम ! 22 जुलैला ऑफलाइन सभा

या भागात केली जनजागृती

शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव जेथे जास्त आहे त्या ठिकाणी महापालिकेतर्फे प्रात्यक्षिक व चित्रांच्या आधारे जनजागृती केली जात आहे. कामगार वर्गात डेंग्यूसंदर्भात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आतापर्यंत विडी घरकुल, शास्त्रीनगर, योगेश्‍वरनगर, स्वागतनगर येथील विडी कारखान्यांमधील कामगारांची जनजागृती करण्यात आली आहे. शिवाय संपूर्ण बाळे परिसराचा कंटेनर सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

ठळक बाबी...

  • पाऊस झाल्यानंतर साठलेल्या पाण्यात वाढताहेत डेंग्यूचे डास

  • घरातील साठवणुकीच्या स्वच्छ पाण्याच्या ठिकाणी डासांची अंडी

  • फवारणीचे काम युद्धपातळीवर सुरू

  • स्वच्छ पाण्याच्या साठवणुकीची भांडी रिकामी करावीत

  • कोरडा दिवस पाळण्याची, म्हणजेच त्या दिवशी सर्व पाण्याची भरलेली भांडी रिकामी करण्याची गरज

  • ताप, अशक्तपणा, थंडी वाजून येणे आदी आहेत डेंग्यूची लक्षणे

  • डेंग्यूसदृश आजारात डेंग्यू तपासणी निगेटिव्ह तरीही लक्षणे

  • डॉक्‍टरांचा सल्ला व उपचार तातडीने घेणे आवश्‍यक

हेही वाचा: वाहनचालकांनो, वाहतूक कोंडीवर निघाला तोडगा!

डेंग्यूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेतर्फे शहरात सर्वत्र फवारणीचे काम सातत्याने सुरू आहे. याशिवाय कंटेनर सर्वेक्षणावर भर दिला असून प्रादुर्भाव असलेल्या भागात जनजागृती करण्यात येत आहे.

- डॉ. अरुंधती हराळकर, आरोग्याधिकारी, महापालिका

डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ताप, थकवा, अशक्तपणा अशा प्रकारची लक्षणे या आजारात आढळून येतात. खासगी रुग्णालयात या प्रकारच्या रुग्णांची संख्या खूपच अधिक आहे. पावसाच्या आगमनानंतर या रुग्णांची संख्या वाढते आहे.

- डॉ. श्रीकांत पागे, खासगी वैद्यकीय व्यावसायिक

loading image