esakal | चिमुकल्यांची ऑगस्टमध्ये ऑफलाइन शाळा? आरोग्य अन्‌ आपत्ती व्यवस्थापनाला प्रस्ताव
sakal

बोलून बातमी शोधा

School

चिमुकल्यांची ऑगस्टमध्ये ऑफलाइन शाळा? आपत्ती व्यवस्थापनला प्रस्ताव

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

ऑनलाइन शिक्षणाच्या भडिमारामुळे विद्यार्थ्यांमधील शारीरिक विकार वाढले असून, त्यांच्यातील लठ्ठपणाही वाढल्याचे आरोग्य तपासणीतून समोर आले आहे.

सोलापूर : ऑनलाइन शिक्षणाच्या (Online education) भडिमारामुळे विद्यार्थ्यांमधील शारीरिक विकार वाढले असून, त्यांच्यातील लठ्ठपणाही वाढल्याचे आरोग्य तपासणीतून समोर आले आहे. राज्यातील अंदाजित 70 लाख मुले अँड्रॉईड मोबाईलविना आहेत. ते विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती असून बालविवाहाचे (Child Marriage) प्रमाणही लक्षणीय राहिले आहे. या पार्श्‍वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) सार्वजनिक आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी (Department of Public Health and Disaster Management) प्रस्ताव तयार केला आहे. त्यात कोरोनामुक्‍त (Covid-19) गावांमध्ये चौथी ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करता येतील, का अशी विचारणा केल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. (The state's offline school for children will begin in August-ssd73)

हेही वाचा: जिल्ह्यात 20 लाख संशयितांची कोरोना चाचणी! ग्रामीणमध्ये चिंता कायम

कोरोनामुळे राज्यात सध्या "शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू' असा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, ऑनलाइनमुळे बहुतांश मुले एकलकोंडी झाली असून त्यांच्यातील चिडचिडेपणा वाढला आहे. शाळांमधील खेळ बंद झाल्याने त्यांच्यातील लठ्ठपणाही वाढला आहे. मोबाईल व टीव्हीच्या अतिरेकामुळे कानाचे व डोळ्यांचे आजारही वाढल्याचे आरोग्य तपासणीतून समोर आल्याचे सोलापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले. त्यावर उपाय म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोरोनामुक्‍त गावांमध्ये चिमुकल्यांची ऑफलाइन शाळा समाज मंदिरात, पारावर अशा मोकळ्या जागेत सुरू करण्याचा निर्णय घेतला. जवळपास 15 हजार विद्यार्थ्यांना नियम पाळून त्या ठिकाणी शिक्षणाचे धडे दिले जात असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी सांगितले. ऑफलाइन शाळा सुरू करण्याची खूप गरज असून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पालकांचा सर्व्हे केला. त्यामध्ये राज्यातील सात लाख पालकांपैकी 82 टक्‍के (5,60,818) पालकांनी ऑफलाइन शाळा सुरू करावी, असा अभिप्राय नोंदविला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आता ऑफलाइन शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा: "ठाकरे कुटुंबीयांची आपुलकी भावली..!'

शाळा सुरू का होणार?

  • ऑनलाइनच्या अतिरेकामुळे डोळ्यांसह आवाज ऐकू न येण्याची वाढली समस्या

  • राज्यातील अंदाजित 70 लाखांहून अधिक मुलांच्या पालकांकडे नाहीत अँड्रॉईड मोबाईल

  • ऑनलाइन शिक्षणापासून दूर राहिलेले विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती; बालविवाहही वाढले

  • उंचीप्रमाणे वजन नाही, पौष्टिक आहाराअभावी शारीरिक वाढीवर परिणाम झाल्याचे आरोग्य तपासणीतून आले समोर

  • कोरोनामुक्‍त गावांमध्ये सध्या आठवी ते बारावीचे वर्ग सुरू; त्याच गावात चौथी ते सातवीचेही वर्ग सुरू होणार

सध्या ऑफलाइन शाळा सुरू करण्याची खूप गरज आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन ऑगस्टमध्ये ऑफलाइन शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे.

- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्‍त, मुंबई

loading image