
Solapur News: महापालिकेचा अजब कारभार! आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पार्क मैदानावर ५ हजारांसाठी टेनिस बॉल सामन्यांना परवानगी
सोलापूर : स्मार्ट सिटीतून तब्बल २२ कोटी रुपयांचा खर्च करून इंदिरा गांधी पार्क स्टेडिअम आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यात आले. या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने व्हायला काही हरकत नाही, असा रिपोर्ट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नुकताच ‘बीसीसीआय’ला पाठवला.
पण, पाच हजारांच्या वाढीव भाड्यासाठी महापालिकेने लेदर बॉल सामन्यांच्या या मैदानावर टेनिस बॉल सामन्यांना परवानगी दिली. मैदान सुस्थितीत राहावे, यासाठी टेनिस बॉल सामन्यांना परवानगी देऊ नये, अशी मागणी जिल्हा क्रिकेट असोसिएशनने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर काही दिवसांपूर्वी महापौर चषक, कर्नल सी. के. नायडू व कुचबिहारी ट्रॉफीचे सामने खेळवले गेले आहेत. मैदानावरील खेळपट्टी (पिच) आंतरराष्ट्रीय सामान्यांसाठी उत्तम असल्याचे मत माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्यासह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने भारतीय क्रिकेट मंडळाला पाठवला आहे.
त्यातून सोलापूरकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा पल्लवित झाली आहे. आता १२ फेब्रुवारीला कर्नल सी. के. नायडू ट्रॉफीचा अंतिम सामना पार्क स्टेडिअमवर होईल, असे जिल्हा क्रिकेट असोसिएशनने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, पार्क स्टेडिअमवर यापुढे टेनिस बॉल सामने खेळायला परवानगी दिली जाऊ नये. मैदान अस्वच्छ होऊ नये, अशी मागणी जिल्हा क्रिकेट असोसिएशन, अंम्पायर असोसिएशनने केली आहे.
सचिव चंद्रकांत रेंबर्सु, संतोष बडवे, सर्फराज सय्यद, मुश्ताक खैराटकर, नागेश राव, योगेश येमूल, मल्लेश याळगी, अक्षय हावळे, राजेश येमूल, नागेश वल्याळ, सुनील मालप, प्रकाश भुतडा, रोहित जाधव, किशोर बोरामणी, सत्यजित जाधव, शिवा अकलूजकर आदींनी टेनिस बॉल सामन्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मैदानाची देखभाल-दुरुस्तीला असावे प्राधान्य
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आता इंदिरा गांधी पार्क स्टेडिअम अतिशय देखणे झाले असून मैदानाची बॉन्ड्री, खेळपट्ट्या, पॅव्हेलियन, बैठक व्यवस्था, खेळाडूंच्या ड्रेसिंग रूम, राहण्याची सोय अतिशय उत्तम असल्याचा रिपोर्ट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला गेला आहे.
आगामी काळात आंतरराष्ट्रीय सामने याठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे मैदानाची स्वच्छता, देखभाल- दुरुस्ती वेळोवेळी व्हायला हवी, अशी अपेक्षा क्रिकेटपटूंनी महापालिकेकडे केली आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटलांनी घालावे लक्ष
सत्ताधारी भाजपचे आमदार तथा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पार्क स्टेडिअमवर रणजी सामने, आंतरराष्ट्रीय सामने व्हावेत म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. पण, या मैदानावर फक्त लेदर बॉल सामन्यांनाच परवानगी हवी.
लेदर बॉल सामन्यांसाठी प्रत्येकी सात हजार रुपये तर टेनिस बॉल सामन्यासाठी १२ हजार रुपये भाडे आहे. अवघ्या पाच हजार रुपयांसाठी टेनिस बॉलला दिली जाणारी परवानगी कायमची बंद व्हावी, यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील लक्ष घालणार का, त्यासंबंधीच्या सूचना महापालिकेला करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.