esakal | अनगरमध्ये गांजाची लागवड ! संशयितास चार दिवसांची कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

cannabis

अनगरमध्ये गांजाची लागवड ! संशयितास चार दिवसांची कोठडी

sakal_logo
By
राजकुमार शहा

अनगर येथील एका शेतात शेतकऱ्याने बांधावर गांजाची लागवड करून त्याची बेकायदा विक्री करत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली.

मोहोळ (सोलापूर) : शेतातील बांधावर गांजाच्या (cannabis) झाडांची लागवड करून त्याची बेकायदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात मोहोळ पोलिसांनी (Mohol Police) छापा टाकून तेथून सहा लाख 85 हजार रुपयांचा 66 किलो गांजा जप्त केल्याची घटना अनगर (ता. मोहोळ) येथे घडली. हनुमंत धर्मा शिंदे (रा. अनगर) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मंगळवारी गुन्हा दाखल झाला असून, हनुमंत शिंदे या संशयितास मोहोळ पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हनुमंत शिंदे याला मोहोळ येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला 17 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (The suspect, who was cultivating cannabis in a field in Anagar, got police custody-ssd73)

हेही वाचा: कॉलेज सकाळी तर शाळा दुपारी! जिल्ह्यात उद्यापासून 345 शाळा उघडणार

मोहोळ पोलिस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस पथक गस्त घालत असताना अनगर येथील एका शेतात शेतकऱ्याने बांधावर गांजाची लागवड करून त्याची बेकायदा विक्री करत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजकुमार डुणगे, सहाय्यक फौजदार चंद्रकांत कदम, युसूफ शेख, गणेश दळवी, पांडुरंग जगताप, मंगेश बोधले, रवींद्र बाबर, हरीश थोरात या कर्मचाऱ्यांचे पथक त्या ठिकाणी पोचले असता हनुमंत धर्मा शिंदे (वय 55, रा. अनगर) याने त्याच्या शेताच्या बांधावर गांजाची झाडे लावून त्याची बेकायदा विक्री करीत असल्याचे आढळून आले. दरम्यान, जप्त केलेला गांजा रासायनिक तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविणार असल्याचे पोलिस निरीक्षक सायकर यांनी सांगितले. या घटनेची फिर्याद सहाय्यक फौजदार चंद्रकांत औदुंबर कदम यांनी मोहोळ पोलिसांत दिली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर करीत आहेत.

हेही वाचा: सदस्यांनाच माहिती नाही झेडपीचा अधिनियम ! 22 जुलैला ऑफलाइन सभा

सहा फूट गांजाची 65 झाडे

दरम्यान, याबाबत हनुमंत शिंदे याला पोलिसांनी विचारले असता त्याने सुरवातीला उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली. पोलिसांनी त्या ठिकाणाहून पाच ते सहा फूट उंचीची गांजाची तब्बल 65 झाडे ताब्यात घेतली. त्याचे वजन केले असता ते 66 किलो भरले. या वेळी पोलिस विभागाने तहसीलदार जीवन बनसोडे यांना पाचारण करून पंचनामा केला. त्याचे बाजारमूल्य सहा लाख 85 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

loading image