esakal | आठ वर्षांपासून फरार अट्टल चोरटा अटकेत ! साडेआठ लाखांचे दागिने हस्तगत; पुण्यासह अनेक गावांत गुन्हे

बोलून बातमी शोधा

Crime

आठ वर्षांपासून फरार अट्टल चोरटा अटकेत ! साडेआठ लाखांचे दागिने हस्तगत; पुण्यासह अनेक गावांत गुन्हे

sakal_logo
By
अशपाक बागवान

बेगमपूर (सोलापूर) : खुनासह दरोडा, घरफोडी व मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेल्या व आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शिताफीने पकडून आठ लाख 49 हजार किमतीचे सोने- चांदीचे दागिने हस्तगत केले. सपाल्या ऊर्फ हनमंतू भीमशा शिंदे (वय 40, रा. जामगाव, ता. मोहोळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, कामती (बु) पोलिस ठाण्यांतर्गत बेगमपूर, वाघोली व कोरवलीसह औराद, भंडारकवठे (ता. द. सोलापूर) व हडपसर (पुणे) येथे केलेल्या विविध गुन्ह्यांची कबुली त्याने दिली आहे.

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी, खुनासह दरोडा, खुनी हल्ला, खुनाची धमकी देत चोरी, मंदिरातील साहित्य व मोटारसायकल चोरी अशा विविध गुन्ह्यांसह मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेला हा आरोपी मागील आठ वर्षांपासून फरार होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सराईत व मोक्का अंतर्गत कारवाई झालेले परंतु फरार गुन्हेगारांची शोध मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवरच वरील गुन्ह्यातील आरोपी शोधण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेतील अन्य अधिकारी व कर्मचारी यांना योग्य त्या सूचना देत आरोपी शोध मोहीम हाती घेतली होती.

हेही वाचा: पंढरपूर-मंगळवेढ्याचा आमदार कोण? पोस्टल मताने सकाळी आठ वाजता सुरू होणार मतमोजणी

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांच्या सहकाऱ्यांना आरोपी सपाल्या शिंदे हा टाकळी (ता. मिरज, जि सांगली) येथे एका नातेवाइकाकडे असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय सूत्राकडून मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी टाकळी येथे जाऊन आरोपीस अंत्यत शिताफीने ताब्यात घेतले.

या वेळी वेळोवेळी तो टोळी, टोळीतील सदस्य बदलून सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक भागात दरोडे, घरफोड्यांसारखे गंभीर गुन्हे करीत असल्याची माहिती मिळाली. याशिवाय बेगमपूर, वाघोली, कोरवली, औराद, भंडारकवठे आदी गावांमध्ये घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली आहे. कामती व मंद्रूप पोलिस ठाण्याअंतर्गत घरफोडी करून 170 ग्रॅम सोन्याचे व 55 ग्रॅम चांदीचे दागिने व एक मोटारसायकल असा सुमारे आठ लाख 49 हजार किमतीचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला.

हेही वाचा: Video पेटला उजनी धरणातील पाण्याचा प्रश्‍न ! "जनहित', "प्रहार'चे जलाशयातच आंदोलन

ही कामगिरी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक खाजा मुजावर, पोलिस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख, महिला अंमलदार मंजुळा धोत्रे, ज्योती काळे यांनी बजावली. पुढील तपास कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने व त्यांचे पथक करीत आहे.

मागील आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या अट्टल गुन्हेगाराकडून आणखी मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता असून, त्यादृष्टीने तपास यंत्रणा कार्यरत आहे

- अंकुश माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक, कामती पोलिस ठाणे