esakal | कोरोनापासून वाचण्यासाठी की कोरोनाला घरी नेण्यासाठी? लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

Akkalkot

कोरोनापासून वाचण्यासाठी की कोरोनाला घरी आणण्यासाठी? लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी

sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील नागरिकांना मागील तीन महिन्यांपासून लस (Vaccination) घ्या, सुरक्षित आहे, असे म्हणत आरोग्य खाते घरोघरी जाऊन मागे लागले होते. त्या वेळी त्या लसीच्या सुरक्षिततेवरच शंका व्यक्त करीत कर्मचारी वर्गांना तोंडाला येईल ते बोलण्याचे धोरण काही जणांनी अवलंबिले होते. दरम्यान, कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आली आहे आणि त्यातच आपल्या घरातील, मित्रपरिवार तसेच शेजारी यांचे बळी जात असल्याने अनेक जणांना हीच असुरक्षित वाटणारी लस अचानकच सुरक्षित व खात्रीची वाटू लागली आहे. त्यातून पाच- सहा दिवसांच्या खंडानंतर 2450 लसीचे डोस तालुक्‍यातील 24 ठिकाणी पोचते झाले. (There is a big crowd at the vaccination center in Akkalkot taluka)

काल सायंकाळी याची यादी जाहीर झाली आणि आज गुरुवारी सकाळपासूनच लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी झालेली दिसून आली. लस उपलब्धतेच्या दुपटीने नागरिक रांगेत हजर झालेले दिसत आहेत. त्याचबरोबर एकटा लस घेणारे तर त्यासोबत आणखी एक- दोघे केंद्रावर गेल्याने मोठी गर्दी झालेली पाहावयास मिळाली. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर न ठेवल्याने कोरोनापासून वाचण्यासाठी लस घेण्यास आलेल्यांबरोबर आता गर्दीतून कोरोना व्हायरस घरी येण्याची शक्‍यता निर्माण होत आहे.

हेही वाचा: सोने खरेदी करताहात तर सावधान ! इन्कम टॅक्‍स डिपार्टमेंटने लावले "हे' नवीन निर्बंध

आज (गुरुवारी) अक्कलकोट शहरातील ग्रामीण रुग्णालय, जुना तहसील कार्यालय, जेऊर, चपळगाव आदी अनेक ठिकाणी मोठी गर्दी झाल्याने भीती निर्माण होताना दिसत आहे. कोरोना बाहेर फिरल्याने होऊ शकतो म्हणून लॉकडाउन आहे तर लस घ्यायला तोबा गर्दी पाहून आता या ठिकाणी पुन्हा बंदोबस्त ठेवायची वेळ येऊन ठेपली आहे असे दिसत आहे. प्रत्येक वेळी नियंत्रणासाठी प्रशासन व पोलिसच पाहिजे असल्याची बाब अवघड ठरणार आहे. प्रत्येक बाबतीत प्रशासन योग्य त्या सूचना देते, तसेच काळजी घेण्याचे आवाहन करते, त्याकडे काहीजण दुर्लक्ष करतात आणि गळ्याला आल्यानंतर धावपळ करताना दिसत असतात. आता यात कुठेतरी बदल घडण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्राप्त परिस्थितीत स्वयंशिस्त नावाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवून जबाबदारीने वागणे हेच सर्वांच्या हिताचे ठरणार आहे. येत्या काळात लसीकरण केंद्रावर अधिक काळजी घेतली जाणे आवश्‍यक आहे. लसीकरण प्रक्रियेचा येत्या काळात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येणार आहे. त्यामुळे गोंधळ न उडता लसीकरण प्रक्रिया सुरक्षित व जलद पार पाडण्यासाठी काटेकोर नियोजन होणे गरजेचे आहे. आरोग्य कर्मचारी वर्गांना नागरिकांनी नाहक गर्दी न करता सहकार्य करणे हिताचे ठरणार आहे.