esakal | बार्शीत लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड ! सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; पोलिस बंदोबस्त

बोलून बातमी शोधा

Vaccination
बार्शीत लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड ! सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; पोलिस बंदोबस्त
sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : कोरोनाचा प्रादुर्भाव बार्शी शहरात वाढला असल्याचे चित्र समोर येताच स्वतःचे सरंक्षण व्हावे यासाठी गुरुवारी शहरात शासकीय लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड उडाली होती. दिवसभर रांगा लावून नागरिक लस घेत होते. नागरिकांची गर्दी हटविण्यासाठी तसेच रांगा लावण्यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय आहे. शासनाने जाहीर केले, तेव्हा नागरिक लस घेण्यास धजावत नव्हते अथवा त्याकडे दुर्लक्ष करीत होते. पण बाधितांचे प्रमाण अन्‌ दररोज होणारे मृत्यू पाहून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरुन स्वतःचे कोरोनापासून सरंक्षण व्हावे म्हणून लस घेल्यास बाहेर पडले आहेत, असे चित्र पहायला मिळाले.

हेही वाचा: तिढा अकरावी प्रवेशाचा ! मूल्यांकनानंतरच प्रवेश; सायन्ससाठी होईल अंतर्गत चाचणी

शासनाने शुल्क घेऊन लसीकरण करणाऱ्या हॉस्पिटलला गुरुवारी लसीचा पुरवठा केला नाही. त्यामुळे शासकीय सेंटरवर अचानक गर्दी झाल्याने तेथे पोलिस बंदोबस्त ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. नागरिकांच्या गर्दीची झुंबड, सोशल डिस्टन्सिंग याचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता. ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासह 45 वर्षांवरील स्त्री-पुरुषांची लसीसाठी मोठी गर्दी होती. शासनाने 1 मेपासून 18 वर्षावरील वयोगटाचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून सध्या बार्शी शहरात लस पुरवठा करण्यात व्यत्यय येत आहे. सध्या लस वेळेत उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

मागील तीन महिन्यापासून नागरिकांनी लस घ्यावी यासाठी शासनस्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अचानक नागरिक गर्दी करु लागले आहेत. शहरातील कोणत्याही खासगी हॉस्पिटलला गुरुवारी लसीचा पुरवठा करण्यात आला नसल्याने शासकीय सेंटरवर नागरिकांनी गर्दी केली होती. सर्वांना लस मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

- डॉ. अशोक ढगे, तालुका वैद्यकीय अधिकारी, बार्शी