उजनी अजूनही १०० टक्के! शेतीला १७ जानेवारी तर शहरासाठी २० जानेवारीनंतर सुटणार पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'उजनी' @ 100.45 टक्के
उजनी अजूनही १०० टक्के! शेतीला १७ जानेवारी तर शहरासाठी २० जानेवारीनंतर सुटणार पाणी

उजनी अजूनही १०० टक्के! शेतीला १७ जानेवारी तर शहरासाठी २० जानेवारीनंतर सुटणार पाणी

सोलापूर : उजनी धरणाची साठवण क्षमता १२३ टीएमसीपर्यंत असून पावसाळा संपला, त्यावेळी धरण हाऊसफुल्ल होते. आता पावसाळा संपून अडीच महिने होऊनही उजनीत १००.४५ टक्के पाणीसाठा आहे. धरणातून १७ जानेवारीपासून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे.

भीमा नदीच्या पात्रात बांधण्यात आलेले उजनी धरण हे सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. धरणाची भिंत सोलापूर जिल्ह्यात आहे, पण सर्वाधिक पाणीसाठा पुणे जिल्ह्यातच होतो. सहा किलोमीटरपेक्षा रुंदी व १४० किलोमीटरहून लांबी असलेले उजनी धरण आहे. धरणाच्या पाण्यावर ४० हून अधिक साखर कारखाने, १४ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपुरक व्यवसाय, गोड्या पाण्यातील मासेमारी, असे व्यवसाय अवलंबून आहे. त्या सर्वांची दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होते. धरणातून सीमा-माढा, दहिगाव या योजनांमधून शेतीला पाणी दिले जाते. कॅनॉल व बोगद्यातूनही शेतीला पाणी मिळते. भीमा नदीतून सोलापूर शहराला पाणी सोडले जाते. त्याचा नदी काठावरील शेतीला मोठा लाभ झाला आहे. यंदा पावसाळ्यात सलग दोन-अडीच महिने उजनीच्या पाण्यावर विद्युत प्रकल्प सुर होता. त्यातून यंदा रेकॉर्डब्रेक तीन कोटी युनिट वीजनिर्मिती झाली आहे. सोलापूरसह नगर व पुणे जिल्ह्यासाठी उजनी धरण वरदानच आहे.

उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही

उजनी धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा आहे. आता १७ जानेवारीपासून कॅनॉलद्वारे शेतीसाठी महिनाभर पाणी सोडण्यात येणार आहे. पावसाळा संपून अडीच महिने होऊनही धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने यंदा उन्हाळ्यात धरण मायनसमध्ये जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. सर्वांनी पाण्याचा अपव्यय टाळावा.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र प्राधिकरण, सोलापूर

शहरासाठी २५ जानेवारीपर्यंत सुटणार पाणी

सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात आणखी काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. तत्पूर्वी, महापालिकेकडून पाणी सोडण्याच्या मागणीचे पत्र लाभक्षेत्र प्राधिकरणाला पाठविण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील नागरिकांसाठी २० ते २५ जानेवारी दरम्यान भीमा नदीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. त्यानंतर पुढील दीड-दोन महिने शहराच्या पाण्याचा प्रश्न दूर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.