esakal | तुम्हीच सांगा खरं वाटतंय का? आश्रम शाळांबाबत एकही तक्रार नाही...!
sakal

बोलून बातमी शोधा

There is no complaint at the ashram schools in Solapur district

राज्यात बालकांवर होणाऱ्या अत्याचाराची मालिका थांबायला तयार नाही. रोज कोठे ना कोठे अत्याचाराची घटना समोर येत आहे. काही वर्षांत आश्रमशाळांतही अत्याचार होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यावर सरकार उपाययोजना करत आहे. अत्याचार, अन्यायासह अन्य काही तक्रारी असतील तर त्या समोर याव्यात व दोषींवर कायदेशीर कारवाई करता यावी याकरिता शाळांत तक्रारपेट्या ठेवण्यात आल्या आहेत.

तुम्हीच सांगा खरं वाटतंय का? आश्रम शाळांबाबत एकही तक्रार नाही...!

sakal_logo
By
अशोक मुरूमकर

सोलापूर : आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांवर अन्याय, अत्याचार होऊ नये याकरिता सरकार वेगवेगळे प्रयत्न करते. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांवरील अन्यायाला वाचा फुटण्याकरिता शाळेत तक्रार पेटी बसविण्याचा नियम करण्यात आला. या पेटीत विद्यार्थ्याने आपली तक्रार टाकणे अपेक्षित असते. विशेष म्हणजे, कित्येक महिन्यांपासून अपवाद वगळता सोलापूर शहर - जिल्ह्यात या पेटीत एकही गंभीर तक्रार आलेली नाही. यामुळे संबंधित संस्था विद्यार्थ्यांवर तक्रार न देण्याविषयी दबाव आणतात का, असा प्रश्‍न निर्माण होतो. दरम्यान, याविषयी शालेय वर्तुळातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ठामपणे बोलण्यास कोणही तयार नाही. यामुळे एकूणच या प्रकारामागे संस्थाचालकांचा दबाव असल्याच्या संशयास पुष्टी मिळते. 
राज्यात बालकांवर होणाऱ्या अत्याचाराची मालिका थांबायला तयार नाही. रोज कोठे ना कोठे अत्याचाराची घटना समोर येत आहे. काही वर्षांत आश्रमशाळांतही अत्याचार होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यावर सरकार उपाययोजना करत आहे. अत्याचार, अन्यायासह अन्य काही तक्रारी असतील तर त्या समोर याव्यात व दोषींवर कायदेशीर कारवाई करता यावी याकरिता शाळांत तक्रारपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, याबाबत विद्यार्थ्यांत पुरेशी जागृती केली जात नाही. काही ठिकाणी तर तक्रारीच नोंद होऊ नये याकरिता समंजसपणे तक्रारी सोडवल्या जात असल्याचे नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगण्यात आले आहे. तक्रारीच नसतील तर चांगलेच, पण बदनामी होऊ नये यासाठी तक्रार करू देत नसतील तर तक्रारी पुढे कशा येणार हा प्रश्‍न निर्माण होत आहे.

विद्यार्थिनीच्या तपासणीचा गोपनीय अहवाल 
निवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची वेळोवेळी तपासणी होते. यात विद्यार्थिनींच्या मासिक पाळीच्या नोंदी ठेवल्या जातात. त्याचा अहवाल गोपनीय पद्धतीने सादर केला जातो. याशिवाय त्रयस्थ व्यक्तींकडून आश्रमशाळांची तपासणी होत असल्याचे समाज कल्याण विभागाचे निरीक्षक राहुल काटकर यांनी सांगितले.  

आकडे बोलतात... 

सोलापूर जिल्ह्यात आश्रमशाळा 
प्राथमिक विभागाच्या 44 
माध्यमिक विभागाच्या 33 

- शिक्षण घेत असलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी 
10 हजार 560 
-  विद्यार्थिनी ः तीन हजार 504 
विद्यार्थी ः सात हजार 56

आश्रमशाळांत अन्याय व अत्याचार होऊ नये याकरिता संस्थाचालक व मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. सरकारच्या निर्णायनुसार वेळोवेळी कार्यवाही केली जात आहे. निवासी शाळांत शिक्षक विद्यार्थ्यांची काळजी घेतात. निवासी आश्रम शाळांत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शिक्षक पूर्णवेळ काम करत आहेत. कोणत्याही प्रकारचा अन्याय व अत्याचार होऊ नये यासाठी प्रयत्न होत आहे. त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. 
- कैलास आडे, 
सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग

loading image