esakal | सोलापूर जिल्ह्यासाठी होणार स्वतंत्र डाळिंब विभाग ! कृषिमंत्र्यांनी घेतली "किसान आर्मी'च्या मागणीची दखल
sakal

बोलून बातमी शोधा

Pomegranate_Sakal

डाळिंबाबाबत प्रशासन अधिक गतिमान व परिणामकारक होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना व्यापक व जलद मदत होण्याकरिता जिल्ह्यासाठी कृषी विभागांतर्गत स्वतंत्र डाळिंब विभाग व स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी किसान आर्मी व वॉटर आर्मीकडून कृषिमंत्र्यांना करण्यात आली होती. 

सोलापूर जिल्ह्यासाठी होणार स्वतंत्र डाळिंब विभाग ! कृषिमंत्र्यांनी घेतली "किसान आर्मी'च्या मागणीची दखल

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात तब्बल दोन लाख 13 हजार 774.4 एकर डाळिंब क्षेत्र आहे. आणि भविष्यात या क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. डाळिंबाबाबत प्रशासन अधिक गतिमान व परिणामकारक होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना व्यापक व जलद मदत होण्याकरिता जिल्ह्यासाठी कृषी विभागांतर्गत स्वतंत्र डाळिंब विभाग व स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी किसान आर्मी व वॉटर आर्मीकडून कृषिमंत्र्यांना करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन कृषिमंत्री दादा भुसे यांनी अभ्यासपूर्ण प्रस्ताव पाठवण्याचे आदेश जिल्हा स्तराला दिल्याची माहिती किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी दिली. 

डाळिंब क्षेत्रात खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर लागवड कार्यक्रमासोबत विस्तार, प्रबोधन, प्रशिक्षण, विक्री व्यवस्थापन, पीकविमा, संशोधन आदी अनेक बाबींची जोड हवी. कृषी विभागांतर्गत इतर अनेक योजना व कार्यक्रम असल्याने डाळिंब क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी आवश्‍यक असणारा प्रशासकीय पाठिंबा शेतकऱ्यांना मिळू शकत नाही. डाळिंब क्षेत्रातील प्रगतीशी निगडित विविध घटकांमध्ये समन्वय, सुसूत्रता व प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे. या क्षेत्राशी निगडित अडचणी प्रशासकीय पातळीवर तत्काळ व एकत्रितरीत्या सोडवणेही महत्त्वाचे आहे. यासाठी डाळिंब क्षेत्रासाठी स्वतंत्र विभाग व स्वतंत्र अधिकारी - कर्मचारी नियुक्त होणे गरजेचे आहे, असे कदम यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

डाळिंब क्रांती अभियानांतर्गत आम्ही 15 कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. या 15 मागण्यांपैकी ही एक आमची मागणी आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, या मागणीसाठी कसल्याही निधीची गरज नाही. 
- प्रफुल्ल कदम, 
संस्थापक, किसान आर्मी व वॉटर आर्मी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image