esakal | Solapur : 'उजनी' फुल्ल! भीमा नदीत 30 हजार क्‍युसेकचा विसर्ग! नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

उजनी धरण

उजनी धरणाने 110 टक्‍क्‍यांची पातळी ओलांडली असून, धरण परिसरासह दौंड व बंडगार्डन येथून जवळपास 28 हजार क्‍युसेकचा विसर्ग धरणात येऊ लागला आहे.

उजनी धरण फुल्ल ! भीमा नदीत 30 हजार क्‍युसेकचा विसर्ग

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : उजनी धरणाने (Ujani Dam) 110 टक्‍क्‍यांची पातळी ओलांडली असून धरण परिसरासह दौंड (Dound) व बंडगार्डन (Bundgarden) येथून जवळपास 28 हजार क्‍युसेकचा विसर्ग धरणात येऊ लागला आहे. त्यामुळे रविवारी (ता. 10) रात्री सव्वाआठ वाजल्यापासून भीमा नदीत (Bhima River) 30 हजार क्‍युसेक वेगाने तर सकाळी अकरापासून कालव्यातून 700 क्‍युसेक व भीमा-सीना जोड कालव्याद्वारे (बोगदा) 200 क्‍युसेक वेगाने पाणी सोडले जात असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे (Dheeraj Sale) यांनी दिली. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा दिल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कार्यवाही नाहीच

पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण मागच्या वर्षी सप्टेंबरअखेरीस 100 टक्‍के भरले होते. यंदा पाऊस कमी-अधिक प्रमाणात झाल्याने धरण टप्प्या- टप्प्याने पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे शेतीसह सोलापूर शहरातील पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. उजनीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सिंचनाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जिल्ह्यातील हरितक्रांतीत धरणाचा मोठा वाटा राहिला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह धरण परिसरात मुसळधार पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढत असल्याची स्थिती आहे. जलसंपदा विभागाने सावधगिरी बाळगून टप्प्या- टप्प्याने पाणी भीमा नदीतून सोडायला सुरवात केली आहे. सध्या धरणातून 30 हजार क्‍युसेक वेगाने पाणी सोडले जात असून, त्यात आणखी पाच हजारांची वाढ होऊ शकते, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

उजनी धरण 110 टक्‍के भरले असून धरणात येणाऱ्या विसर्गाचा अंदाज घेऊन भीमा नदीतून खाली पाणी सोडले जात आहे. परंतु, दौंड, बंडगार्डन व धरण परिसरातून विसर्ग वाढल्यास नदीतून सोडला जाणारा विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा, सोलापूर

हेही वाचा: पदभार घेण्यापूर्वीच कराळेंची बदली! सोलापूरच्या पोलिस आयुक्‍तपदी बैजल

एक लाख विसर्गापर्यंत धोका नाहीच

नदीचे पात्र मोठे असल्याने एक लाखापर्यंत विसर्ग सोडला, तरीही काही धोका होणार नाही, असा विश्‍वास जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे. मात्र, विसर्ग वाढल्यास पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे.

loading image
go to top