esakal | विठुरायाच्या भेटीला आतुरलेल्या वैष्णवांच्या मेळ्याची यंदा आठवणच!
sakal

बोलून बातमी शोधा

विठुरायाच्या भेटीला आतुरलेल्या वैष्णवांच्या मेळ्याची यंदा आठवणच!

विठुरायाच्या भेटीला आतुरलेल्या वैष्णवांच्या मेळ्याची यंदा आठवणच!

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

दोन्ही ठिकाणच्या गावकऱ्यांनी "ज्ञानोबा माउली तुकाराम' असा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात निरोप दिला.

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी यात्रेच्या (Ashadhi Wari) निमित्ताने पंढरपूरकडे (Pandharpur) निघालेली लाखो पावले दरवर्षी आषाढ शुद्ध अष्टमी दिवशी पंढरपूर तालुक्‍यात पोचतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा (Sant Dnyaneshwar Maharaj) मुक्काम भंडीशेगाव येथील पालखी तळावर तर श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा (Shri Sant Tukaram Maharaj) मुक्काम पिराची कुरोली येथील तळावर असतो. पंढरीनजीक आल्याने विठुरायाच्या भेटीसाठी आतुरलेल्या वारकऱ्यांचा आणि लाखो वैष्णव आपल्या गावात आल्याने तालुक्‍यातील दोन्ही ठिकाणच्या गावकऱ्यांचा आनंद द्विगुणीत होतो. टाळमृदंगाच्या गजराने हा सारा परिसर भक्तिरसात चिंब होतो. परंतु, यंदा प्रतिकात्मक वारी होत असल्याने भंडीशेगावकरांनी आणि पिराचीकुरोली ग्रामस्थांनी अनुक्रमे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे आगमन झाले आहे, असे समजून त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून आरती केली. आषाढ शुद्ध नवमीला दोन्ही पालख्यांचे वाखरीकडे प्रस्थान होते. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या गावकऱ्यांनी "ज्ञानोबा माउली तुकाराम' असा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात निरोप दिला. (This year, only memories of the Warakaris who were eager to visit Vitthal remain-ssd73)

हेही वाचा: अबब! 61 लाखांची ऑनलाइन फसवणूक; शिक्षकांसह नोकदार आमिषाला बळी

आषाढी यात्रेच्या निमित्ताने मजल दर मजल करत निघालेले वारकरी जेव्हा पंढरपूर तालुक्‍यात प्रवेश करतात तेव्हा तालुक्‍याच्या वतीने त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले जात असते. पंढरपूरकरांच्या वतीने होणाऱ्या स्वागतामुळे सारे वारकरी देखील भारावून जात असतात. शेकडो मैल चालत चालत अखेर पालखी मार्गावरील अंतिम टप्प्यात आल्याने वारकरी आनंदून गेलेले असतात आणि या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर तालुक्‍यातील भंडीशेगाव आणि पिराची कुरोलीचे शेकडो ग्रामस्थ जमा झालेले असतात. दरवर्षी हा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होतो. यंदा प्रतिमा प्रतीकात्मक वारी होत असली तरी दोन्ही ठिकाणच्या गावकऱ्यांनी पालखी तळावर संतांच्या प्रतिमांचे पूजन आणि भजन करून दरवर्षीच्या परंपरेला उजाळा दिला.

कोरोनापासून (Covid-19) लवकर मुक्ती मिळावी आणि पुढील लाखो वारकऱ्यांच्या समवेत पालख्यांचे पूर्वीप्रमाणे मोठ्या दिमाखात आगमन व्हावे, देवाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांची सेवा घडावी अशा भावना गावकऱ्यांच्या मनी दाटून आल्या होत्या. शेकडो वर्षाच्या परंपरेप्रमाणे दरवर्षी आषाढ अष्टमी दिवशी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी यांचा मुक्काम पंढरपूर तालुक्‍यातील पिराची कुरोली येथे तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम भंडीशेगाव येथे असतो.

हेही वाचा: शासकीय महापूजेवेळी "यांनाच' मंदिरात प्रवेश !

प्रतिकात्मकरीत्या दिला माउलींना निरोप

भंडीशेगाव येथील पालखी तळावर शनिवारी सायंकाळी माउलींचे प्रतिकात्मक स्वागत करण्यासाठी ग्रामस्थांनी पालखी तळाचा परिसर आणि पालखी चौथरा स्वच्छ केला होता. त्यावर मोजक्‍या ग्रामस्थांच्या उपस्थितीत माऊलींच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. भजन आणि "माउली माउली'चा जयघोष करण्यात आला. तर आज दुपारी प्रथेनुसार माउलींच्या पालखीचे वाखरीकडे प्रस्थान होते. त्यानुसार आज पुन्हा माउलींच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिकात्मकरीत्या माउलींना निरोप देण्यात आला.

तुकोबारायांच्या आगमनाच्या आठवणींना उजाळा

पिराची कुरोली येथील पालखी तळावर संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम आषाढ शुद्ध अष्टमीला असतो, त्यानुसार शनिवारी सायंकाळी पिराची कुरोली येथील तळावर संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच भजन, हरिनामाचा जयघोष करून तुकोबारायांच्या आगमनाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

आषाढीचा अनुपम सोहळा पूर्वीप्रमाणे व्हावा

कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे आणि पुढील वर्षी संत ज्ञानेश्वर माऊली व तुकोबारायांचे लाखो वारकऱ्यांसह आगमन व्हावे, आषाढी यात्रेचा अनुपम आनंद सोहळा पूर्वीप्रमाणे मोठ्या दिमाखात, थाटात व्हावा, अशा भावना यावेळी दोन्ही गावातील गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.

loading image