esakal | अजबच कारभार ! सर्वसामान्यांना दंड अन्‌ हजारोंच्या सभांकडे मात्र दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

PDR_Mob

कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लावले जात असताना, पंढरपूर, मंगळवेढ्यात मात्र नियमांची पायमल्ली करून शेकडोंच्या उपस्थितीत निवडणुकीच्या प्रचार सभा होताहेत. एकीकडे नियम मोडल्यास व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून दंड वसूल केला जातोय तर दुसरीकडे राजकीय सभांकडे मात्र दुर्लक्ष करून दुजाभाव केला जातोय. 

अजबच कारभार ! सर्वसामान्यांना दंड अन्‌ हजारोंच्या सभांकडे मात्र दुर्लक्ष

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लावले जात असताना, पंढरपूर, मंगळवेढ्यात मात्र नियमांची पायमल्ली करून शेकडोंच्या उपस्थितीत निवडणुकीच्या प्रचार सभा होताहेत. एकीकडे नियम मोडल्यास व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून दंड वसूल केला जातोय तर दुसरीकडे राजकीय सभांकडे मात्र दुर्लक्ष करून दुजाभाव केला जातोय. मोठी सभा झाल्यानंतर एखाद्या संयोजक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला जातो; परंतु हजारोंच्या उपस्थितीत सभा झाल्यानंतर कागदे रंगवण्यासाठी कारवाई करण्याऐवजी गर्दी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची गरज आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शहर आणि ग्रामीण भागातील दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. काल राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दक्षता म्हणून आणखी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. असे असताना पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शेकडोंच्या उपस्थितीत सभा होऊ लागल्या आहेत. अपवाद वगळता सर्वच राजकीय पक्षांकडून कोरोना नियमांची ऐशी- तैशी केली जात आहे. 

21 मार्च रोजी पंढरपूर येथील श्रीयश पॅलेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारणा सुरू झाली आणि मग प्रशासनाला दखल घ्यावी लागली. कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रवादी कॉंग्रसचे संदीप मांडवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दरम्यान, काल पंढरपूर तालुक्‍यातील रांझणी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा झाली. मागील वेळेप्रमाणे ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांच्या बरोबरच पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने यांच्यासह अनेक नेतेमंडळींसमोर शेकडोंच्या उपस्थितीत सभा झाली. जयंत पाटील यांनी कोरोना नियमांचे गांभीर्याने पालन करा, असा सल्ला न देता उलट गर्दी पाहून "कोरोना जगात नाही असे वाटत आहे, त्यामुळे मास्क काढून बोलतोय' असे उपरोधिक वक्तव्य केले. कालच्या गर्दीची दखल घेऊन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

येत्या काही दिवसांत भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीकडील राज्य पातळीवरील अनेक मंत्री, आमदार यांच्यासह दिग्गज मंडळी प्रचारासाठी येणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी हजारोंच्या उपस्थितीत सभा घेतल्या जाण्याची शक्‍यता आहे. अशा वेळी सभेसाठी हजारो लोक एकत्र येऊन कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे सभा संपल्यानंतर केवळ कागदे रंगवण्यासाठी एखाद्या संयोजकावर कारवाई करण्याऐवजी गर्दी होऊच नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल