esakal | आज जिल्ह्यातील 45 वर्षांखालील सात जणांचा मृत्यू; 1390 रुग्णांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

आज जिल्ह्यातील 45 वर्षांखालील सात जणांचा मृत्यू; 1390 रुग्णांची भर

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना बाधितांनी आता एक लाखाकडे वाटचाल सुरू केली आहे. ग्रामीण भागात दररोज सरासरी बाराशे तर शहरात दोनशे ते अडीचशे रुग्ण आढळत आहेत. आज शहरात 168 तर ग्रामीणमध्ये एक हजार 222 रुग्णांची वाढ झाली. चिंतेची बाब म्हणजे शहर- जिल्ह्यातील 45 वर्षांखालील सात जणांचा कोरोनाने बळी घेतला.

शहरातील रुग्णसंख्या आता 24 हजार 513 झाली असून ग्रामीणमधील 69 हजार 279 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 77 हजार 103 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 14 हजार 59 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून त्यांच्यासाठी जिल्हाभरात 20 हजार 153 बेड्‌सची सोय करून देण्यात आली आहे. मात्र, त्यामध्ये ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याच्याही तक्रार वाढू लागल्या आहेत.

हेही वाचा: कडक लॉकडाउनचा सोलापुरात बळी ! खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या

आज माळशिरसमध्ये 231, माढ्यात 95, मंगळवेढ्यात 87, उत्तर सोलापूर तालुक्‍यात 44 तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 38 जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. या पाच तालुक्‍यातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. परंतु, मोहोळ तालुक्‍यात 97 रुग्ण वाढले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर पंढरपूर तालुक्‍यात 234 रुग्ण वाढले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बार्शीत 153 रुग्ण वाढले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच अक्‍कलकोटमध्ये 14 रुग्ण वाढले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. करमाळ्यात 190 रुग्ण वाढले असून दोघांचा तर सांगोल्यात 39 रुग्ण वाढले आहेत. त्या तालुक्‍यातील एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे.

कर्त्यांवरच कोरोनाचा हल्ला

कुटुंबाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेऊन आई-वडिलांच्या स्वप्नांचा रथ गरिबीतूनही पुढे ओढणाऱ्या तरुणांवरच कोरोनाने हल्ला चढविला आहे. आज शहरातील डोणगाव रोड (सलगर वस्ती) येथील 30 वर्षीय महिला, विजयपूर रोडवरील माजी सैनिक नगरातील 35 वर्षीय तरुण आणि सदर बझार परिसरातील 45 वर्षीय महिलेचा तर कोर्ट कॉलनी (इंदिरा नगर) येथील 45 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ग्रामीणमधील जहानपूर (ता. बार्शी) येथील 46 वर्षीय पुरुषाचा, अक्‍कलकोटमधील मुजावर गल्लीतील 31 वर्षीय तरुण आणि मांजरी (ता. सांगोला) येथील 35 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे. उपचारासाठी विलंब करू नका, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, लक्षणे असल्यास कोरोनाची टेस्ट करून घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाने सर्वांना केले आहे.

loading image