esakal | Solapur : राष्ट्रवादीचा कॉंग्रेसला धक्‍का! कॉंग्रेसचे माजी महापौर अन्‌ माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादीत
sakal

बोलून बातमी शोधा

NCP चा कॉंग्रेसला धक्‍का!

कॉंग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले व माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

NCPचा कॉंग्रेसला धक्‍का! माजी महापौर, माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादीत

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादीच्या (NCP) तुलनेत कॉंग्रेसने (Congress) सर्वाधिक जागा मिळवल्या. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आगामी निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला. मात्र, सोलापूरमध्ये कॉंग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले (Nalini Chandele) व माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल (Sudhir Kharatmal) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसला खिंडार पडले आहे.

हेही वाचा: 'गुरे-गोठ्यांमध्ये रमणाऱ्या कांबळेंनी झेडपीचे दालन टक्केवारीचे केले!'

आगामी महापालिका निवडणुकीत महापौर आमचाच, अशी वल्गना करत कॉंग्रेसने "कॉंग्रेस मनामनात - कॉंग्रेस घराघरात' ही मोहीम सुरू केली होती. कॉंग्रेसच्या एकमेव आमदार तथा कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत हे अभियान सुरू आहे. या अभियानामध्ये पक्षांतर केलेले दोन्हीही नेते आमदार प्रणिती शिंदे यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसल्याचे पाहायला मिळाले. मात्र पक्षातील अंतर्गत गटबाजी व कमी झालेल्या मान- सन्मानाला वैतागून माजी महापौर नलिनी चंदेले व माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित लढावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मेटकरी यांच्यासह अन्य नेत्यांनी व्यक्त केली होती. मात्र या तिन्ही पक्षांतील पदाधिकारी व नेतेमंडळी एकमेकांच्या पक्षांत पक्षांतर करत असल्याने ही महाविकास आघाडी भविष्यात टिकेल की नाही, याबद्दल मतमतांतरे सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षीय राजकारणातून अंग काढल्याचे बोलले जात आहे. यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. दुसरीकडे, प्रदेशची जबाबदार असल्याने आमदार प्रणिती शिंदे यांना शहराकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे पक्ष संघटन विस्कटल्याचे या पक्षांतरानंतर स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.

कोठेंचे समर्थकही करणार पक्षांतर?

2017 च्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसला "हात' दाखवून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतलेले महेश कोठे यांनी महापालिकेत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर आणून ठेवले. मात्र आता महेश कोठे यांनीच राष्ट्रवादीची वाट धरल्याने त्यांच्या कुटुंबातील नगरसेवकांसह त्यांचे नगरसेवकही पक्षांतर करतील,अशी चर्चा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी भाजप विरोधात एकत्रित लढणार नाही, असाही तर्क काढला जात आहे.

हेही वाचा: नियमबाह्य कर्ज वाटपप्रकरणी बॅंकेचे अधिकारी गोत्यात! चौकशीचे आदेश

कालपर्यंत आमच्यासोबत असणारे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल व माजी महापौर नलिनी चंदेले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना कॉंग्रेसने मोठी पदे देऊनही त्यांनी पक्षांतर का केले, हे समजले नाही. परंतु, लोकशाहीमध्ये कोणी कोणत्या पक्षात जावे, हे ज्याचे त्याला स्वातंत्र्य आहे.

- चेतन नरोटे, कॉंग्रेस गटनेते, सोलापूर महापालिका

loading image
go to top