नामशेष होऊन हद्दपार झालेले युरेशियन गिधाड दोन दशकांनंतर पुन्हा 'उजनी'त दाखल! | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नामशेष होऊन हद्दपार झालेले युरेशियन गिधाड दोन दशकांनंतर पुन्हा 'उजनी'त दाखल!
नामशेष होऊन हद्दपार झालेले युरेशियन गिधाड दोन दशकांनंतर पुन्हा 'उजनी'त दाखल!

नामशेष झालेले युरेशियन गिधाड दोन दशकांनंतर पुन्हा 'उजनी'त दाखल!

केत्तूर (सोलापूर) : उजनीची (Ujani Dam) जैवविविधता दिवसेंदिवस जैवसंपन्न होत आहे. हिवाळ्याच्या प्रारंभीच यावर्षी देशी-विदेशी पक्षी उजनी जलाशयाच्या विस्तीर्ण पाणी साठ्यावर दाखल होऊ लागले आहेत. आता हजारो किलोमीटरचा प्रवास करून युरोपमधील युरेशियन गिधाडही (Eurasian vulture) उजनीत दाखल झाले आहे. गेल्या आठवड्यात पळसदेव (ता. इंदापूर) (Indapur) परिसरात पक्षी निरीक्षक उमेश सल्ले यांना हे गिधाड दिसून आले आहे.

उजनीच्या परिसरात विविध जातींच्या पक्ष्यांचे आगमन होत असते. यामध्ये बऱ्याच दुर्मिळ किंवा वैशिष्ट्यपूर्ण जातींच्या नवनवीन पक्ष्यांचा समावेश असतो. पक्ष्यांचे स्थलांतर हे काही काळासाठीही असू शकते किंवा काही कालावधीनंतर पुन्हा-पुन्हा होऊ शकते. उजनी पाणलोट भागात अशा नवनव्या पक्ष्यांची स्थलांतरं कायम राहावी व निसर्गाच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून आपण सर्वांनी मिळून त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. पक्ष्यांची शिकार टाळावी, तसेच प्रशासनानेही या गोष्टींकडे गांभीर्याने पाहावे, यासाठी 'सकाळ'ने मागील काही दिवसांत 'उजनी पाणलोट परिसरात पक्ष्यांची शिकार' या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते.

हेही वाचा: ST कर्मचाऱ्यांना 150 कोटी वाढीव वेतन! संप मिटवण्यासाठी तीन पर्याय

'नैसर्गिक अन्नसाखळी'त गिधाड, घार हे पक्षी महत्त्वाची भूमिका बजावतात. गेल्या काही वर्षांपूर्वी हे गिधाड आढळून आल्यानंतर त्याच्या अधिवासाच्या अभ्यासासाठी त्याला या भागात टॅग करण्यात आले आहे. या गिधाडाचे वैशिष्ट्य म्हणजे, युरोपमधून येऊनही त्याचे पाय काळपट रंगाचे असतात, तर हिमालयीन गिधाडाचे पाय गुलाबी रंगाचे असतात. या पक्ष्याचे लांबूनच निरीक्षण करावे, त्याला त्रास होईल असे वर्तन पर्यटकांनी करू नये. दरम्यान, महाराष्ट्रात पांढरे, काळे व लांब चोचीची गिधाडे 1990 पूर्वी मोठ्या प्रमाणात होती.

भारतात गिधाडांच्या नऊ प्रजाती अस्तित्वात आहेत. यात या नव्या प्रजातीची भर अभ्यासली जात आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र यातील बऱ्याच प्रजातींची संख्या मागील काही दशकांत अचानकपणे कमी झाली आहे, ही गंभीर बाब आहे. आययूसीएन स्वित्झर्लंडच्या यादीमध्ये गिधाड या प्रजातीचा समावेश हा 'रेड बुक'मध्ये येतो, म्हणजेच 'गंभीरपणे धोक्‍यात' या वर्गात येतो. यांचे जतन आणि संवर्धन होणे आवश्‍यक झाले आहे. जर नाही झाले तर भविष्यात हे पक्षी पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असा याचा अर्थ होतो. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अन्वयेसुद्धा गिधाडांची शिकार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यत: यांना 'स्कॅव्हेंजर' असे संबोधले जाते म्हणजे 'सफाई कामगार'. जे प्राणी मृत झाले त्यांचे मांस खाऊन हे पक्षी आपली उपजीविका करतात. मात्र अभ्यासाअंती असे लक्षात आले की, प्राण्यांच्या मांसामध्ये 'डायक्‍लोफेनॅंक सोडियम' जे वेदना कमी होण्यास वापरले जाणारे औषध आढळले ते गिधाडांच्या पोटात मांसाच्या माध्यमातून गेल्यामुळे गिधाडांच्या पोटात किडनीचे आजार होऊन भारतातील बऱ्याच गिधाडांचे मृत्यू होऊन त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी झाली आहे आणि आता गिधाडांची गणना करण्याची वेळ आली आहे.

'व्हल्चर रेस्टॉरंट' ही संकल्पना महाराष्ट्रातील काही भागात राबवली गेली आहे. जर भविष्यात उजनी धरण परिसरात गिधाडांची संख्या वाढली तर अशी संकल्पना याही भागात राबवावी लागेल. याने महाराष्ट्रात या सफाई कामगारांची संख्या वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. भारत सरकारनेही गेल्या वर्षी देशात गिधाडांच्या संवर्धनासाठी 'गिधाड कृती योजना 2020-25' अशी योजना आखली आहे. यातून गिधाडांचे संवर्धन केले जाईल. सरकार व ईला फाउंडेशन यांच्या अथक प्रयत्नांमुळे सध्या काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश येत आहे.

हेही वाचा: बार्शीचा पैलवान मनोज माने म्हणतो, 'महाराष्ट्र केसरी' जिंकणारच!

सोलापूर जिल्ह्यातून जवळपास नामशेष होऊन हद्दपार झालेले गिधाड, दोन दशकानंतर पुन्हा उजनी जलाशयावर आपले अस्तित्व दाखवल्याने ही अतिशय आनंददायी गोष्ट आहे. निसर्गातील स्वच्छतेचे देवदूत म्हणून ओळखणारे गिधाड हे नाना प्रकारच्या देशी- विदेशी पक्ष्यांची पंढरी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आढळून आल्यामुळे पक्षी वैभवात आणखी भर पडले आहे.

- डॉ. अरविंद कुंभार, पक्षी व पर्यावरण अभ्यासक

नवनवीन प्रजातींच्या पक्ष्यांच्या आगमनामुळे उजनीची जैवविविधता तसेच उजनीचे सौंदर्य वरचेवर वाढत आहे. या सर्वांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

- कल्याणराव साळुंके, पक्षीप्रेमी, करमाळा

loading image
go to top