गडकोटांच्या संवर्धनासाठी दोन तरुणांचा सायकल प्रवास ! 18 राज्यांत पोचवणार संदेश 

conservation of forts
conservation of forts

सोलापूर : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांची झालेली बिकट अवस्था पाहून मन हेलावून गेलेल्या दोन तरुणांनी या गडकोटांचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आणि सुरू केला संजीवनी सफर - भारत भ्रमण (सायकलवर प्रवास). मंगळवारी या दोन तरुणांनी सोलापूरला भेट दिली. 

लातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील संतोष बालगीर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील देवळाणा गावातील सुनील थोरात या शेतकऱ्यांच्या पोरांनी हा सायकल प्रवास सोमवारी लातूर येथून सुरू केला आहे. बालगीर यांचे शिक्षण एमएस्सी झाले असून थोरात यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. हे दोघेही औरंगाबादमध्ये शिक्षणासाठी असताना एका क्‍लासमध्ये त्यांची ओळख झाली आणि त्यातून त्यांची मैत्री जमली. 

त्यानंतर दोघांनीही राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व गडकोट पाहून घेतले. या गडकोटांची सध्या अत्यंत बिकट अवस्था झालेली पाहून त्यांचे मन हेलावले गेले आणि या गडकोटांचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे, यासाठी काय करता येईल याचा विचार मनात घोळू लागला. आणि या विचारातूनच ज्या - ज्या ठिकाणी असे गडकोट आहेत, त्या - त्या ठिकाणी सायकलवरून जाऊन हा इतिहास जपण्याविषयी जनजागृती करण्याचा ठाम निर्णय घेतला. हा निर्णय संजीवनी सफर - भारत भ्रमण मोहीम स्वरूपात राबविण्यास दोघांनीही 21 डिसेंबर रोजी लातूर येथून सुरवात केली. 

जागतिक वारसा स्थळांचे संरक्षण व संवर्धन करणे काळाजी गरज असल्याचा संदेश घेऊन निघालेले सायकलस्वार संतोष बालगीर व सुनील थोरात हे दोघेही मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास सोलापूर शहरामध्ये दाखल झाले. या दोघांचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष भाऊसाहेब रोडगे, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख लहू गायकवाड यांनी करून त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी मेघराज पसारे, अर्जुन चवरे, अक्षय खबाले आदी उपस्थित होते. 

मोहीम भारतीय सैन्याला समर्पित 
संजीवनी सफर - भारत भ्रमण ही मोहीम जागतिक वारसा स्थळांचे संरक्षण व जतन व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आली असून, ही भ्रमंती 18 राज्यांतील 80 शहरांतून पूर्ण करण्यात येणार आहे. एकूण चार महिन्यांचा हा प्रवास महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, कन्याकुमारी, लेह-लडाख, दिल्ली मार्गे महाराष्ट्र असा सायकलवर करण्यात येणार आहे. ही मोहीम भारतीय जनतेचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्याच्या शौर्याला समर्पित करीत असल्याची भावना लातूरचे सायकलस्वार संतोष बालगीर यांनी व्यक्त केली. गडकोटांचे संवर्धन होणे ही काळाची गरज असून, त्यांचे संरक्षण न झाल्यास आपण आपल्या पुढच्या पिढीला इतिहास सांगू शकणार नाही, असे मत सुनील थोरात यांनी व्यक्त केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com