उजनी जलाशयात चक्रवाक बदकांचेही आगमन | Ujani Dam enter Duck | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chakravak Duck

उजनी जलाशयात चक्रवाक बदकांचेही आगमन

केत्तूर (सोलापूर) : उजनी जलाशयाचे (Ujani Dam) विशेष आकर्षण असलेल्या रोहित व पट्टकदंब हंसांच्या आगमनानंतर आलेल्या चक्रवाक बदकांच्या (Chakravak Duck) आगमनामुळे उजनीच्या पक्षी वैभवात भर पडली आहे. दरवर्षी आवर्जून हजेरी लावणाऱ्या पक्षाबरोबरच इतरही अनेक नानाविध पक्ष्यांचे धरणावर आगमन होत आहे.

चक्रवाक ही मनमोहक बदके अफगाणिस्तान, लेह-लडाख, हिमालय व नेपाळच्या पलीकडील मंगोलिया या ठिकाणी मूळ वास्तव्याला आहे. नुकतेच उजनीच्या पाणलोट क्षेत्रात ही बदके येऊन दाखल झाली आहेत. 'टाडोर्ना पेरुगिनिया' असे शास्त्रीय नाव असलेल्या हंस गणातील या बदकाला इंग्रजीत ब्राह्मणी डक तसेच रूढी शेल्डक या नावाने ओळखतात. ब्राह्मणी बदक, चकवा-चकवी व सोनेरी बदक असे मराठीतील अन्य नावे या विदेशी बदकाला आहेत. संपूर्ण अंगावर बदामी किंवा भगव्या रंगाचा सोनेरी पिसे असलेल्या या बदकाचे डोके व मान केतकी रंगाची आहे. शेपटी काळ्या रंगाची असते.

हेही वाचा: शीना बोरा जीवंत असल्याचा दावा किती खरा? फॉरेन्सिक अहवालामधून समोर आले सत्य

ही बदके नेहमीच्या बदकांपेक्षा आकाराने मोठे असतात. नेहमी जोडी करून वावरणाऱ्या नर व मादी बदकांमध्ये फारसा फरक आढळत नाही; मात्र बारकाईने निरीक्षण केल्यास नराच्या गळ्यातील काळ्या पट्टीमुळे नराला ओळखता येतो. शिवाय वितकाळात नरांना गडद बदामी रंग प्राप्त होतो. ही बदके मिश्राहारी आहेत. ती पाणवनस्पतींची कोवळी पाने, खोड व कोंब यासह गोगलगाय, घटक मासे, बेडूक, चिखलातील कृमी व कीटक या खाद्यांवर अवलंबून राहतात. ही बदके स्थलांतर करून दाखल झाल्यावर स्थानिक पक्ष्यांबरोबर सलगी करून वावरत असतात. एप्रिल ते जूनदरम्यान विणीच्या काळात ही बदके पावसाळ्यात पूर्ण वाढ होऊन बलिष्ठ झालेल्या आपल्या पिल्लावळांसह भारत भ्रमंतीला येतात व देशभर विखुरले जातात. महाराष्ट्रातील सर्वच जलस्थानांवर ही बदके आढळतात.

बदकामधील वैशिष्ट्ये

विणीच्या हंगामानंतर या बदकांच्या अंगावरील संपूर्ण पिसे गळून पडतात आणि ते विद्रूप वाटतात. या कारणामुळे पुढील तीन-चार आठवडे ते उडू शकत नाही. पिल्लांसह त्यांना नवीन पिसे येतात. त्यानंतर नव्याने जन्माला आलेल्या पिल्लांसह स्थलांतर करून भारतात येतात. प्रणयक्रिडेतील तरबेज पक्षी म्हणून या बदकांकडे पाहिले जाते. या बदकांमध्ये एकदा जमलेली जोडी आयुष्यभर एकनिष्ठेने साथ निभावते. जमलेल्या जोडीतील एखाद्याचा काही कारणाने मृत्यू झाला तर दुसरा पण विरहाने मृत्यू पत्करतो, अशी आख्यायिका आहे.

हेही वाचा: अकोला : मनपा निवडणुकीला ओबीसी आरक्षणाची बाधा!

आकर्षक रंगसंगती लाभलेल्या या बदकांनी उड्डाण घेतल्यावर ते अधिक सुरेख दिसतात. उडताना बदामी रंगांच्या पंखांना काळा पांढरा रंग प्राप्त होतो. त्यावर हिरव्या रंगाचा पट्टा दिसत असल्याने त्यांचा उड्डाण अधिकच मोहक वाटतो. हिवाळ्यात उजनीवर येऊन दाखल झालेली ही बदके चार- पाच महिन्यांच्या पाहुणचारानंतर मार्च-एप्रिलदरम्यान परत आपल्या वंशाभिवृद्धीसाठी मूळ स्थानांकडे निघून जातात. मांसासाठी या बदकांची शिकार केली जाते. शिकाऱ्यांची कुणकण लागली की ही बदके अतिशय सावध होतात व स्वतः बरोबर इतर पक्ष्यांना मोठमोठ्याने ओरडून धोक्‍याचा इशारा देतात.

- डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक

Web Title: Ujani Dam Solapur Enter Chakravak Duck

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Solapurujani dam
go to top