सोलापूर : उजनीच्या पाणीसाठ्यात वेगाने घट

धरणातून सध्या एकूण पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
ujani dam
ujani damsakal

केत्तूर: बघता बघता उजनी धरणाचा पाणीसाठा ३० टक्क्यांच्या खाली म्हणजेच २९.५१ टक्क्यांवर येऊन ठेपला असून धरणात आता १५.८१ टीएमसी उपयुक्त पाणी शिल्लक राहिले आहे. येत्या महिन्यात पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांना पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या उजनीतून सोलापूरकरांसाठी पाणी सोडण्यात आले असून बोगदा, कॅनॉल व नदीपात्रात असे एकूण पाच हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यातच कडाक्याच्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. उजनीवरील पुणे जिल्ह्यातील टेमघर धरण कोरडे पडले असून पानशेत व वरसगाव या धरणातील पाणीचीही वेगाने घट सुरू आहे. गेल्या वर्षी १०० टक्के उजनी भरल्याने फेब्रुवारीपर्यंत बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र आत्तापर्यंत सोलापूरसाठी दोनदा आवर्तन देण्यात आली व सध्याही आवर्तन चालू असल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने पाण्याची टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

पाणलोट क्षेत्रातील पाणी कमी होऊ लागताच शेतकऱ्यांना विद्युत मोटारी व पाईपलाईन अपेक्षित स्थळी ठेवण्यासाठी लगबग करावी लागते. भारनियमन आणि पाणीटंचाई या दोन्हीचा सामना एकावेळी करताना शेतकरी मेटाकुटीस येतो. हातातोंडाला आलेल्या पिकांना पाण्याची खूप गरज असते. त्यामुळे रात्रंदिवस शेतकऱ्यांना शेतातच ठाण मांडून बसावे लागते. मार्च ते एप्रिलमध्ये उन्हाचा प्रचंड कडाका वाढता राहत असल्याने पिके जगवण्यासाठी बळीराजाला हे तीन महिन्यांत मोठे परिश्रम घ्यावे लागतात. आज धरणात २९.५१ टक्के एवढा पाणीसाठा असून ५०० क्युसेकने सुरू असलेले आवर्तन पाहता येत्या महिन्यात उजनीचा पाणीसाठा मायनस होऊ शकतो अशी स्थिती आहे.

सोलापूरला पिण्यासाठी नदीद्वारे पाणी सोडल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने घट होत आहे. गतवर्षी १०० टक्क्यांच्यावर पाणीसाठा झाल्याने उजनी धरण मायनसमध्ये जाणार नाही, असे वाटत होते. परंतु आताची स्थिती पाहता धरण निश्चितच मायनसमध्ये जाईल, असे वाटू लागले आहे.

- राजेंद्रसिंह पाटील, संचालक, दूध उत्पादक संघ, केत्तूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com