esakal | सोलापूर जिल्ह्यातील गावकऱ्यांत रंगलीय अनोखी स्पर्धा 
sakal

बोलून बातमी शोधा

maravde gav.

कोरोना विषाणू साथीने रोजगाराच्या वाटा बंद झाल्या आहेत. लॉकडाउन असल्याने बंद दरवाज्यांच्या आत अनेक कुटुंबांना उपाशीपोटी जगावे लगत आहे. भीषण वास्तव समोर दिसत असल्याने मरवडे येथील छत्रपती परिवारचे संस्थापक सुरेश पवार यांनी गावातील सर्वच आर्थिकदृष्टीने सक्षम ग्रामस्थांना आवाहन करत संतोषकुमार पवार, नितीन घोडके, भारत मासाळ व मरवडे ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या विचारानुसार गरीब-गरजू कुटुंबांना किराणा वस्तू वाटप करण्याचा निर्णय घेतला.

सोलापूर जिल्ह्यातील गावकऱ्यांत रंगलीय अनोखी स्पर्धा 

sakal_logo
By
श्रीकांत मेलगे

मरवडे (सोलापूर) : कोरोना साथीने उपासमारीला सामोरे जात असलेल्या गरजू-गरीब कुटुंबाना मदतीचा हात पुढे केला तर या कुटुंबाचा आधारवड होता येईल या भावनेतून मरवडेत काही मंडळीकडून 300 कुटुंबाना जीवनावश्‍यक वस्तूंच्या रूपाने मदत केली जात आहे. आता विरोधी विचारांच्या मंडळींनीही गावातील 500 कुटुंबाना मदत करण्याचा चंग बांधत उपक्रमास सुरवात केली आहे. मदतीसाठी गावकऱ्यांत चांगलीच स्पर्धा रंगली असताना उपासमारीच्या वेळी गरजू-गरीब कुटुंबाना सुगीचे दिवस आले आहेत. गोरगरिबांना मदतीसाठी सारा गाव एकविचाराने पुढे आल्याने मदतीचा हा मरवडेकरांचा पॅटर्न चर्चेचा विषय ठरत आहे. 
कोरोना विषाणू साथीने रोजगाराच्या वाटा बंद झाल्या आहेत. लॉकडाउन असल्याने बंद दरवाज्यांच्या आत अनेक कुटुंबांना उपाशीपोटी जगावे लगत आहे. भीषण वास्तव समोर दिसत असल्याने मरवडे येथील छत्रपती परिवारचे संस्थापक सुरेश पवार यांनी गावातील सर्वच आर्थिकदृष्टीने सक्षम ग्रामस्थांना आवाहन करत संतोषकुमार पवार, नितीन घोडके, भारत मासाळ व मरवडे ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या विचारानुसार गरीब-गरजू कुटुंबांना किराणा वस्तू वाटप करण्याचा निर्णय घेतला. गरीब-गरजू कुटुंबाना मदत होणार असल्याने या उपक्रमाला मरवडेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. मोठी आर्थिक स्वरूपात रक्कम जमा झाल्यानंतर या रकमेतून जीवनावश्‍यक वस्तूंच्या स्वरूपात प्रत्येकी 750 रुपयांचे साहित्य 300 कुटुंबांना मदत देण्यात आले. 
गावातील काही मंडळींच्या पुढाकाराने गोरगरीब कुटुंबांना मदत होत असल्याचे पाहून आपणही गावासाठी काहीतरी करावे या भावनेतून प्राचार्य राजेंद्र पोतदार यांच्या आवाहनाला साद घालत गावातील 500 कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी सरपंच लतीफ तांबोळी, दत्तात्रय गणपाटील, श्रीकांत गणपटील, मोहन सरडे, अविनाश फटे, विजय गणपाटील, नीलेश स्वामी हे उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गावकऱ्यांकडून या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. 
गाव कितीही लहान असले तरी गाव म्हटले की गट-तट आलेच. मरवडे गाव तर सुमारे सात हजार लोकवस्तीचे. मंगळवेढा तालुक्‍याची राजधानी अशी गावची ओळख. अशा या गावातही अनेक राजकीय गट असून गोरगरिबांना मदत करण्याच्या एकमेव उद्देशाने मरवडेकर उपक्रमात व्यस्त आहेत. नेहमी राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाने गावागावातील चळवळी मोडीत निघाल्याचे आपण पाहतो; परंतु मरवडेत नागरिकांच्या चळवळीतून एक अनोखी सामाजिक चळवळ उभी राहत असल्याने ती महाराष्ट्रातील अन्य गावांसाठी आदर्शवत ठरणार आहे. 

"सकाळ'च्या कामाची ग्रामस्थांना आठवण 
दैनिक सकाळने तीन वर्षांपूर्वी सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून दोन लाख रुपये देत मरवडे परिसरातील ओढे, नाले यातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. या कामावेळेस ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावत 'एक तास गावासाठी' ही मोहीम यशस्वीपणे राबवित 10 लाखांचे काम त्यावेळी करण्यात आले. "सकाळ'ने दिशा देण्याचे काम केल्यानेच मरवडेकरांनी भविष्यात अनेक सामाजिक चळवळी राबविल्या व यशस्वी केल्या. आता गरीब-गरजूंसाठी उपक्रम राबवित असताना "सकाळ'ने केलेल्या कामाची ग्रामस्थ आवर्जून आठवण काढतात. 

गावातील सर्वच कुटुंबाना मदत होणार

गोरगरिबांना मदत करताना सर्वच मंडळींना सोबत घेऊन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. आता सारीच सुजाण मंडळी हा उपक्रम राबवित असल्याने गावातील सर्वच कुटुंबाना मदत होणार आहे. त्यामुळे याहून वेगळा आनंद काय असणार. 
-सुरेश पवार, संस्थापक अध्यक्ष, छत्रपती परिवार 

सारेच सुरक्षित राहतील. 

आर्थिक अडचणीत उपासमार होत असलेल्या कुटुंबाना जीवनावश्‍यक वस्तू घरपोच मिळाल्या तर पुढील काही दिवस ते घरातच बसतील. मदतीने मरवडेकरांकडून सामाजिक बांधिलकी जपली जाताना लॉकडाउनचा उद्देश सफल होऊन सारेच सुरक्षित राहतील. 
- राजेंद्र पोतदार, ग्रामस्थ

loading image