विद्यापीठाची सत्र परीक्षा 24 जानेवारीपासून ! शेवटचा पेपर 8 फेब्रुवारीला

0Exam_20studant_0 - Copy.jpg
0Exam_20studant_0 - Copy.jpg

सोलापूर : राज्यातील कोरोनाची स्थिती म्हणावी तितकी सुधारलेली नसल्याने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची आगामी सत्र परीक्षा ऑनलाईनच घेण्याचे नियोजन केले आहे. 13 जानेवारीपासून सुरू होणारी परीक्षा आता 24 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या काळात घेण्याचे निश्‍चित केले आहे.

महाविद्यालये सुरूचा निर्णय नाहीच
कोरोनाचे सावट डोक्‍यावर असतानाही शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. सोलापूरसह राज्यभरातील बारा हजारांहून अधिक शाळांमध्ये 18 लाख विद्यार्थी हजेरी लावत आहेत. 23 नोव्हेंबरपासून अद्याप एकही विद्यार्थी कोरोनाच्या जाळ्यात सापडलेला नाही. शाळा व्यवस्थापन समिती, संबंधित शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याची खबरदारी घेतली आहे. ग्रामीण भागातील विशेषत: आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकडे ऍन्ड्राईड साधने उपलब्ध नसल्याने त्यांना शाळेची गरज आहे. मात्र, 23 मार्चपासून अद्याप राज्यातील एकही उच्च महाविद्यालय सुरु झालेले नाही. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात असल्याचा डांगोरा पिटला जात आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचले नसल्याचेही वास्तव समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालये सुरु करण्याची मागणी होत आहे. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने शासनाकडे बोट दाखवित 'वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार मागच्यावेळी द्वितीय व अंतिम वर्षातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन घेण्यात आली. त्यावेळी बहुतांश विद्यार्थ्यानी ऑनलाइन पर्याय निवडला होता. ऑनलाइन परीक्षेमुळे निकाल तत्काळ लावण्यात यश आले. या पार्श्‍वभूमीवर आता बऱ्याच विद्यापीठांनी आगामी सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्याचे ठरवले आहे. परीक्षांचे नियोजन, ऑफलाइन परीक्षांसाठी लागणारे मनुष्यबळ, उत्तरपत्रिका तपासणीसाठी जाणारा वेळ कमी करण्याच्या हेतूने विद्यापीठाने आता ऑनलाईनचाच पर्याय ठेवला आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया साधारणपणे जानेवारीअखेर सुरु राहणार आहे. त्यामुळे त्यांची परीक्षा एप्रिलनंतर होणार असून त्यात थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेतलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश असणार आहे.

पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सोळाव्या दीक्षांत समारंभाची तयारी सुरू झाली आहे. पदवी-पदविका प्रमाणपत्र घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत समारंभ होणार आहे. तत्पूर्वी, 2015 ते 2020 या काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहाशे रुपयांचे शुल्क भरून तर 2005 ते 2014 या काळातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना 900 रुपये शुल्क भरुन पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभासाठी भरलेल्या ऑनलाइन अर्जाची साक्षांकित प्रत 8 फेब्रुवारीपर्यंत विद्यापीठात जमा करावी, असेही शहा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com