विद्यापीठाचा युवा महोत्सव ७ ते १० ऑक्टोबरला मंगळवेढ्याच्या कदम गुरुजी महाविद्यालयात

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा अठरावा युवा महोत्सव ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान मंगळवेढ्यातील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
ahilyadevi-holkar SOLAPUR UNIVERCITY
ahilyadevi-holkar SOLAPUR UNIVERCITYsakal

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा अठरावा युवा महोत्सव ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान मंगळवेढ्यातील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून युवा महोत्सवाच्या यजमानपदासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयाने युवा महोत्सव घेण्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यानुसार समितीने संबंधित महाविद्यालयास भेट देऊन पाहणी केली आणि युवा महोत्सवाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. कोरोनामुळे गतवर्षीचा युवा महोत्सव ऑनलाइन पद्धतीने पार पडला. कोरोनामुळे तो ऑफलाइन होऊ शकला नाही. कोरोना कमी झाल्याने दोन वर्षाच्या कालावधीनंतर ऑफलाइन पद्धतीने युवा महोत्सव होत आहे. त्यामुळे भारतीय विश्वविद्यालय संघाकडून प्राप्त सूचनेनुसार काही बदल यंदाच्या वर्षीसाठी करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा

युवा विद्यार्थी कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील सृजनरंगाला एक हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी विद्यापीठाकडून दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यासाठी विद्यार्थी कलाकारांचा देखील मोठा प्रतिसाद दरवर्षी युवा महोत्सवाला लाभतो. संलग्नित महाविद्यालयातील युवा विद्यार्थी कलाकारांनी महोत्सवात सहभागी होण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करावी. ३० सप्टेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांची व संघाची प्रवेशिका देणे आवश्यक असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

कलाकार विद्यार्थ्यांची वयोमर्यादा बदलली

युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी युवा विद्यार्थी कलाकारांची वयोमर्यादा २५ वर्षांवरून २७ करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन संघ व्यवस्थापक, तीन व्यावसायिक साथीदार आणि विद्यार्थी मिळून एकूण ४९ जणांच्या संघाची प्रवेशिका यंदा स्वीकारली जाणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षापासून युवा महोत्सवात कथाकथन आणि काव्यवाचन या कलाप्रकारांचा समावेश करण्यात आल्याचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी सांगितले. त्यामुळे यंदाच्या युवा महोत्सवात २९ कलाप्रकारांचे सादरीकरण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com