esakal | डॉ. वासुदेव रायते यांचे निधन; साहित्य- संगीताचा उपासक अन् पर्यावरणप्रेमी हरपला
sakal

बोलून बातमी शोधा

Vasudev Raite Founder President of Anandashree Pratishthan in Solapur passed away

डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक तथा आनंदश्री प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. वासुदेव रायते यांचे रविवारी (ता. २३) अल्पशा आजाराने निधन झाले.

डॉ. वासुदेव रायते यांचे निधन; साहित्य- संगीताचा उपासक अन् पर्यावरणप्रेमी हरपला

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक तथा आनंदश्री प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. वासुदेव रायते यांचे रविवारी (ता. २३) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. माधवी रायते, मुलगा डॉ. नीरज रायते, सून, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मोदी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुंभरी येथील डॉ. अश्विनी सहकारी रुग्णालयात त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यातच दोन दिवसापूर्वी त्याचा कोरोना अहवाल पाँझिटीव्ह आला. उपचार सुरु असतानाच रविवारी दुपारी २ वाजता त्यांचे निधन झाले.

डॉ. वासुदेव रायते यांनी पुणे, मुंबई, मिरज, अंबाजोगाई व सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात २५ वर्षे अध्यापन केले.  मेडिसिन विभागाचे ते काही काळ प्रमुख होते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील मेडिसिन अभ्यास मंडळाचे ते सभापती होते. डायबिटीस असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई या संस्थेचे ते आजीव सदस्य होते. 
डायबेटिक सेल्फ केअर फाउंडेशन नवी दिल्ली, असोसिएशन ऑफ फिजिशियनस ऑफ इंडिया मुंबई, रेडक्रॉस सोसायटी ऑफ इंडिया सोलापूर तसेच सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचचे ते आजीव सदस्य होते. आहारशास्त्र, रुग्णालय व्यवस्थापन, वैद्यकीय शिक्षण तंत्र या विषयावर तसेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस मुंबई या संस्थेत त्यांनी मधुमेह या विषयावर विशेष प्रशिक्षण घेतले होते. 

आरोग्य शिक्षण, पर्यावरण, निसर्ग संवर्धन, व्यसनमुक्ती, निसर्गोपचार या विषयावर त्यांनी आकाशवाणीवर लोकप्रबोधनपर व्याख्याने दिली. दैनिकातुन आरोग्य शाळा हे स्तंभ लेखन केले. हृदयविकार, अतिदक्षता, योग आणि आरोग्य या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी आपली मते मांडली. महाराष्ट्र साहित्य परीषद जुळे सोलापूरचे ते काही काळ अध्यक्ष होते.सोलापूर आकाशवाणीवर आरोग्य दीपिका या विषयावर त्यांनी १५५ भागातून आरोग्य प्रबोधनपर माहिती दिली. धर्मवीर संभाजी तलावाजवळील स्मृती उद्यान उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.

साहित्य, संगीत, सामाजिक, पर्यावरण या विषयावर त्यांनी केलेल्या कार्याबद्दल विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले होते. यामध्ये लायन्स इंटरनॅशनल क्लबचा राज्यस्तरीय वृक्षसंवर्धन पुरस्कार, सोलापूर महापालिकेचा महापौर सन्मान, स्वर्गीय दीनदयाळ ग्रामीण विकास संशोधन प्रशिक्षण संस्थेचा वृक्षमित्र पुरस्कार, पुण्यातील डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाचा डॉ. आजगावकर स्मृती पुरस्कार, बँक ऑफ इंडिया शताब्दी महोत्सव आणि बँक ऑफ महाराष्ट्राचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, किर्लोस्कर वसुंधरा निसर्गमित्र पुरस्कार, मधुमेह मित्र मंडळ मिरज- सांगलीचा जीवनगौरव पुरस्कार, सोलापूरच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश होता. निष्णात डॉक्टर, निसर्गप्रेमी, समाजिक कार्याची  आवड असणारे, साहित्याचा उपासक तसेच संगीतावर अलोट प्रेम करणारा रसीक अनंताच्या प्रवासाला निघुन गेला. महाराष्ट्र साहित्य परीषद जुळे सोलापुरच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image