ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांची लागली सर्वांनाच ओढ ! मात्र यावर्षीही कोरोनाने फेरले पाणी 

Yatra-Jatra.
Yatra-Jatra.

केत्तूर (सोलापूर) : गतवर्षी ग्रामीण भागातील ग्रामदेवतांच्या यात्रा-जत्रांच्या ऐन हंगामातच कोरोना महामारीच्या संकटाने कहर माजविल्याने या यात्रा-जत्राच रद्द करण्यात आल्या होत्या. मोजक्‍याच भाविकांच्या उपस्थितीत प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे व अटींचे पालन करीत धार्मिक विधी पार पाडण्यात आले होते. यावर्षी गतवर्षीची कसर भरून निघणार व यात्रा- जत्रांचा हंगाम पुन्हा पूर्वीप्रमाणेच मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात बहरणार, असाच सर्वांचा अंदाज होता. परंतु, फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढल्याने व प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असल्याने यावर्षी होणाऱ्या जत्रा-यात्राही जवळजवळ रद्द झाल्यातच जमा आहेत. 

चैत्र महिन्यात बऱ्याच गावांतील जत्रा- यात्रांचा हंगाम सुरू होतो. शेतातील रब्बी पिकांची काढणी पूर्ण झालेली असते. वाड्या-वस्त्यांवरील देवी-देवतांचा यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू होतो. उन्हाळ्यात जत्रा- यात्रांमुळे ग्रामीण भागांमध्ये वर्दळ वाढते. गावातील परगावी (शहराकडे) नोकरी, धंदा व पोट भरण्यासाठी गेलेली मंडळी सहकुटुंब गावच्या यात्रेला आवर्जून हजेरी लावतात. तसेच पाहुणे-रावळे मित्र कंपनीलाही आवर्जून यात्रेसाठी निमंत्रण- आमंत्रण दिले जाते. याच वेळी घरातील सर्व मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाल्याने नवीन सोयरिकही जमविली जाते. 

या जत्रा-यात्रांमधील धार्मिक कार्यक्रमांमध्ये कीर्तन, देवाचा लग्न सोहळा, पालखी, छबिना मिरवणूक याबरोबरच करमणुकीसाठी ऑर्केस्ट्रा, तमाशा आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असते. याबरोबरच नामवंत तसेच गावातील मल्लांच्या जंगी कुस्त्यांचा फडही भरविला जातो. या कुस्त्यांसाठी परिसरातील गावांतून मोठ्या संख्येने मल्ल (पैलवान) हजेरी लावतात. 

यात्रा-जत्रा काळात ग्रामीण भागातील आर्थिक उलाढाल वाढल्याने व्यावसायिकही खुशीत असतात. परंतु गतवर्षी प्रमाणे याही वर्षी या उत्सवांवरील ग्रहण कायम आहे. त्यामुळे हा हंगाम वाया जाणार आहे. काही महिन्यांपूर्वीच कोरोनाची लसही आली आहे, परंतु कोरोना मात्र आपली पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे संकटात भरच पडत आहे. 

ग्रामीण भागातील जत्रा- यात्रांचा हंगाम म्हणजे छोट्या व्यवसायांसाठी सुवर्णसंधीच. व्यापारी या काळात वर्षभराची कमाई करतात. तमाशा, ऑर्केस्ट्रा यामुळे व्यवसाय वाढतो. परंतु कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग पाहता हे सर्व थांबणार असल्याने व्यापाऱ्यांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. 

एकूणच, आगामी यात्रा- जत्राना कोरोनाची बाधा येऊन या संकटामुळे सर्वच व्यावसायिकांवर गंडांतर येणार, हे निश्‍चित. वर्षातून एकदा होणाऱ्या या जत्रा- यात्रांसाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून ग्रामस्थ एकत्र येतात व गाववर्गणी करून यात्रा पार पाडली जाते. बच्चे कंपनीपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या जत्रा- यात्रांचा मनापासून आनंद घेतात. परंतु, कोरोना संकटामुळे त्या आनंदावर विरजण पडणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com