esakal | कोरोना इफेक्‍ट : भिकाऱ्यांची अन्न पाण्यासाठी पंढरपूरच्या रस्त्यावर भटकंती 
sakal

बोलून बातमी शोधा

Wander the streets of Pandharpur to get food and water for beggars

रॉबिन हूड आर्मीचे अन्नदान 
येथील रॉबिन हूड आर्मीच्या वतीने बस स्थानकावर असलेल्या काही भिकाऱ्यांना अन्नदान केले. त्यामुळे येथील काही भिकाऱ्यांना दिलासा मिळाला. शहरातील भिकाऱ्यांना अन्न आणि पाणी देण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करावी, अशी मागणीही आता पुढे येऊ लागली आहे. 

कोरोना इफेक्‍ट : भिकाऱ्यांची अन्न पाण्यासाठी पंढरपूरच्या रस्त्यावर भटकंती 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी पहिल्यांदाच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर बंद ठेवण्यात आल्यामुळे मंदिर परिसरातील व्यापारी, दुकानदार, हॉटेल, हारफुले, गंध लावणारी मुले यांच्या व्यवसायावर जसा परिणाम झाला आहे. त्यापेक्षा चंद्रभागा वाळवंटात आणि मंदिर परिसरात भाविकांनी दिलेल्या भिकेवर आपली गुजराण करणाऱ्या भिकारी आणि निराश्रित वृद्धांवर गेल्या चार दिवसांपासून उपासमारीची वेळ आली आहे. 

शहरातील भिकाऱ्यांची उपासमार होत असल्याचे लक्षात येताच काही संवेदनशील नागरिकांनी व संघटनांनी काही भिकाऱ्यांना अन्न देऊन त्यांची भूक भागवण्याचा प्रयत्न केला. परंतु, बहुतांश भिकारी अन्न आणि पाण्याच्या शोधासाठी शहरातून आज फिरत असल्याचेही विदारक चित्रही यानिमित्ताने पाहायला मिळाले. देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने गेल्या आठ दिवसांपासून शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. सोलापूर जिल्ह्यात "कोरोना'चा रुग्ण आढळून आला नसला तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने खबरदारी म्हणून पंढरपुरातील विठ्ठल मंदिर बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 

दर्शनासाठी मंदिर बंद असल्याने राज्यासह देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम येथील स्थानिक व्यापारी, दुकानदारांसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर झाला आहे. त्यापेक्षाही केवळ भाविकांच्या भिकेवर आपली गुजराण करणाऱ्या शेकडो भिकाऱ्यांना भीक मिळणे बंद झाले आहे. त्यातच रविवारी (ता. 22) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यासही शहर व तालुक्‍यातील लोकांनी शंभर टक्के प्रतिसाद देत बंद पाळला. त्याचाही फटका आज चंद्रभागा घाट, नामदेव पायरी, प्रदक्षिणामार्ग, पश्‍चिमद्वार, संत तुकाराम भवनासह विविध ठिकाणी बसणाऱ्या भिकाऱ्यांचे हाल झाले. शहरातील सर्व हॉटेल, टपऱ्या बंद असल्यामुळे चहा-पाणीही मिळाले नाही. त्यातच शहरातील रस्ते निर्मनुष्य असल्याने शहरातील भिकाऱ्यांची आज चांगलीच उपासमार झाली. अनेक भिकारी लोकांच्या दारोदार जाऊन पाणी देण्याची विनंती करत होते. काही लोकांनी पाणी देऊन त्यांची तृष्णा शांत करण्याचा प्रयत्न केला. तर, काही ठिकाणा भिकाऱ्यांना साधे पाणी देखील न मिळाल्याने त्यांचा जीव कासावीस झाल्याचेही दिसून आले.

loading image