Solapur News : पाणी जपूनच वापरावे लागणार; उजनी ३२ टक्क्यांवर; ४० लघु प्रकल्प कोरडेठाक

उजनीमुळे जिल्ह्यातील पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सोलापूर शहराचीही तहान उजनीमुळेच भागली आहे.
Water Projects
Water ProjectsSakal

सोलापूर - उजनीमुळे जिल्ह्यातील पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सोलापूर शहराचीही तहान उजनीमुळेच भागली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सात मध्यम व ४० लघु प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकऱ्यांसह शंभराहून अधिक गावांचीही तहान भागली आहे. मात्र यंदा पाऊस कमी झाल्याने उजनी धरण ६६ टक्केच भरले.

सध्या धरणात ३२.८५ टक्के पाणीसाठा असून मध्यम व लघु प्रकल्प आताच तळाशी गेले आहेत. त्यामुळे डिसेंबर किंवा नववर्षाच्या सुरवातीलाच जिल्ह्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भीषण स्थिती उद्‍भवण्याची चिन्हे आहेत. आता प्रत्येकालाच पाणी जपून वापरावे लागणार हे निश्चित आहे.

बोरी - सद्यस्थिती

 • पाणी साठवण क्षमता : ०.८ टीएमसी

 • सिंचनाखालील क्षेत्र : १४०० हेक्टर

 • अवलंबून गावे : ५१

 • नगरपरिषदांना पाणीपुरवठा : दुधनी, अक्कलकोट, मैंदर्गी

 • सद्य:स्थिती : ०.२ टीएमसी

जवळगाव - सद्यस्थिती

 • पाणी साठवण क्षमता : १.२३ टीएमसी

 • सिंचनाखालील क्षेत्र : २५०० हेक्टर

 • अवलंबून गावे : २१ गावे (काटी, सारोळे, ज्योतिबाची वाडी, आंबेगाव व अन्य)

 • सद्य:स्थिती : ०.१५ टीएमसी

पिंपळगाव ढाळे - सद्यस्थिती

 • पाणी साठवण क्षमता : ०.४४ टीएमसी

 • सिंचनाखालील क्षेत्र : २५०० हेक्टर

 • अवलंबून गावे : ९ (बावी, महागाव, चिखर्डे, साकत, तांबेवाडी, कळंबवाडी, शेलगाव, मळेगाव, पिंपळगाव)

 • सद्य:स्थिती : ००० टीएमसी

हिंगणी - सद्यस्थिती

 • पाणी साठवण क्षमता : १.०७ टीएमसी

 • सिंचनाखालील क्षेत्र : १६०० हेक्टर

 • अवलंबून गावे : १० गावे (वैराग, उपळे दुमाला, गौडगाव, नांदणी, जामगाव, हळदुगे व इतर)

 • सद्य:स्थिती : ०.०३ टीएमसी

एकरूख - सद्यस्थिती

 • पाणी साठवण क्षमता : १.१० टीएमसी

 • सिंचनाखालील क्षेत्र : १२२९ टीएमसी

 • अवलंबून गावे : ११ (सोलापूर, शेळगी, देगाव, बेलाटी, कवळे, डोणगाव, बाणेगाव, भोगाव, बाळे, खेड)

 • सद्य:स्थिती : ०.४३ टीएमसी

आष्टी - सद्यस्थिती

 • पाणी साठवण क्षमता : ०.८ टीएमसी

 • सिंचनाखालील क्षेत्र : २००० हेक्टर

 • अवलंबून गावे : ६ (रोपळे, अनगर, मोडनिंब, मोहोळ, येवती, माढा)

 • सद्य:स्थिती : ०.०२ टीएमसी

मांगी - सद्यस्थिती

 • पाणी साठवण क्षमता : १ टीएमसी

 • सिंचनाखालील क्षेत्र : ३११६ हेक्टर

 • अवलंबून गावे : ८ (जातेगाव, बोरगाव, राऊळगाव)

 • सद्य:स्थिती : ०.०७ टीएमसी

एकरुख योजना ठप्प; अक्कलकोट तहानलेलेच

कर्नाटकलगत असलेला अक्कलकोट तालुका सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असून उजनी धरणातून बोरी व हरणा नदीच्या संगमाजवळील बोरी मध्यम प्रकल्पात पाणी यायला तब्बल १२५ दिवस लागतात. टंचाईच्या काळात उजनीतून नदीद्वारे पाणी सोडता येत नाही. प्रकल्पाजवळ सात केटीवेअर असून त्यातून काही गावांना व शेतीला पाणी मिळते.

वास्तविक, अक्कलकोट तालुक्याची तहान भागावी म्हणून एकरुख योजनेतून पाणी उचलून बोरी प्रकल्पात टाकण्याची योजना प्रस्तावित आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी बदलले, राज्यातील सत्ता अनेकदा बदलली, परंतु अजूनपर्यंत अक्कलकोटची तहान भागलेली नाही. बार्शी तालुक्यातील पिंपळगाव ढाळे प्रकल्पाच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे.

‘कुकडी’तून मांगीत पाणी आणण्यास अडचणी

कुकडी प्रकल्पातून करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याचे प्रयोजन आहे. मात्र, कुकडी ते मांगी हे अंतर पार करताना वाटेत २७ बंधारे लागतात. त्यामुळे एक टीएमसी क्षमतेचा मांगी प्रकल्प भरण्यासाठी कुकडीतून किमान दोन ते अडीच टीएमसी पाणी सोडावे लागते. त्यामुळे एक टीएमसी की अडीच टीएमसीचे पैसे द्यायचे हा पेच कायम आहे.

कुकडीतून मांगी प्रकल्पात पाणी सोडण्याचा प्रस्ताव पाठविला, पण अद्याप निर्णय नाही. त्यामुळे संभाव्य टंचाईचा अंदाज घेऊन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षण ठेवावे, असे पत्र अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे.

उजनी धरणातील पाणीसाठा फेब्रुवारीत उणे जाण्याची शक्यता आहे. यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सात मध्यम व ४० लघू प्रकल्पात देखील पाणी कमीच आहे. संभाव्य टंचाई ओळखून सर्वांनीच पाणी पिण्यासाठीच तेही जपून वापरावे. जेणेकरून पुढील पावसाळ्यापर्यंत टंचाईची तीव्रता जाणवणार नाही.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

१९७२ च्या दुष्काळात बांधलेला हिंगणी मध्यम प्रकल्प द्राक्ष, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नेहमीच वरदान ठरला आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे. परिणामी परिसरातील उसाचे, द्राक्ष बागेचे व इतर फळबागेचे क्षेत्र घटणार आहे.

- श्रीरंग काटमोरे, शेतकरी. पिंपरी (सा),ता. बार्शी

ढाळे पिंपळगाव प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला आहे तसेच हिंगणी प्रकल्पाची पाणी पातळी मायनसमध्ये गेली असून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा, जनावराच्या चाऱ्याचा तसेच शेतातील उभ्या पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील उद्योग क्षेत्रास देखील दुष्काळी परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

- अरविंद माळी, उपळे (दु), ता. बार्शी

जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आताच गंभीर होत आहे. कुर्डुवाडी परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नुकताच आम्हाला रास्ता रोको करावा लागला. उजनीच्या पाण्यावरील जिल्ह्याचे अवलंबित्व कमी कारायचे असेल तर जिल्ह्यात मध्यम व लघू प्रकल्पाची संख्या वाढविणे आणि ते भरतील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

- आशा टोणपे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना महिला आघाडी, (ठाकरे गट)

हिप्परगा (एकरुख)तलावातून सोलापूरला होणारा पाणीपुरवठा हा प्रदूषण विरहित असतो. त्याबरोबर दरवर्षी हिप्परगा तलावातील पक्षी निरीक्षण आणि तलाव परिसरात फिरणे ही सोलापूरकरांसाठी मेजवानी असते. यासाठी प्रतिवर्षी हिप्परगा तलाव भरणे व पुढील वर्षीचा पावसाळा सुरू होईपर्यंत तलावात पुरसे पाणी असणे आवश्यक आहे. हिप्परगा तलाव हे सोलापूरकरांसाठी हृदय आहे.

- सुचित्रा बिराजदार, मंगळवार पेठ, सोलापूर

तलावात पाणी नसल्यामुळे उचल पाणीपुरवठा योजनेतून पाणी नेणाऱ्या शेतकऱ्यांची शेतीच धोक्यात येणार आहे. याचा आर्थिक फटका बसणार आहे. पाईपलाईनसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते फेडता येणार नाहीत. कर्जबाजारीपणा वाढणार आहे. चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. पाणी आटल्यामुळे तलावातील जमिनीवर अतिक्रमण वाढले जाते.

- संगीता भोसले, महिला जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी चर्मकार संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com