esakal | कुरनूर धरणातून 1800 क्‍युसेकचा विसर्ग ! बोरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

कुरनूर धरणातून 1800 क्‍युसेकचा विसर्ग ! बोरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अक्कलकोटची वरदायिनी असलेल्या कुरनूर धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह लाभक्षेत्रातील जोरदार पावसाने वाढला आहे.

कुरनूर धरणातून 1800 क्‍युसेकचा विसर्ग ! गावांना सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोटची (Akkalkot) वरदायिनी असलेल्या कुरनूर धरणात (Kurnoor Dam) येणाऱ्या पाण्याचा प्रवाह लाभक्षेत्रातील जोरदार पावसाने (Heavy Rain) वाढला आहे. त्यामुळे रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून सुमारे 1800 क्‍युसेक प्रतिसेकंद या वेगाने बोरी नदी (Bori river) पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, नदी काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: शाळा सुरु करण्याचा अ‍ॅक्‍शन प्लॅन तयार! चिमुकली शिक्षकांबाबतच अनभिज्ञ

चार-पाच दिवस पाऊस थांबलेला होता. त्यामुळे धरणातून सुरू करण्यात आलेला विसर्ग कमी करण्यात आला होता. त्यातच पुन्हा शनिवारपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा धरणात येणाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे तीन दरवाजे उघडून सुमारे 1800 क्‍युसेक प्रतिसेकंद या वेगाने पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली आहे. धरणाच्या खालील बाजूला सांगवी, बणजगोळ, मिरजगी, सातनदुधनी, संगोगी, रुद्देवाडी व बबलाद हे बंधारे आहेत. अक्कलकोट, दुधनी व मैंदर्गी नगरपरिषद अशा मिळून बोरी नदीकाठच्या 40 हून अधिक गावांच्या शेतकरी व नागरिकांना मागील वर्षी आलेल्या पुराच्या वाईट अनुभवावरून अधिक सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी चपळगाव परिसरात तासभर जोरदार पाऊस झाला असून, आणखी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असे असले तरी तालुक्‍याच्या उत्तर भागात जास्त पावसाने तर दक्षिण भागात पाऊस कमी झाल्याने अधिक चिंता व्यक्त होत आहे.

मागील वर्षी धरण प्रशासनाच्या वतीने पाणी सोडताना योग्य काळजी न घेता आणि पाण्याचे नीट नियोजन न करता आवश्‍यक तो पाण्याचा प्रवाह न ठेवल्याने पूरस्थिती आवाक्‍याबाहेर जाऊन अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. तो यावेळी होऊ नये, अशी मागणी बोरी नदीकाळच्या गावांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची धडाकेबाज कारवाई!

सहा मंडळांना दक्षतेचा इशारा

अक्कलकोट, चपळगाव, किणी, वागदरी, दुधनी व मैंदर्गी या सहा मंडळांना प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहे. शनिवारी (ता. 4) कुरनूर धरणाच्या पाणलोट परिसरामध्ये सततचा पाऊस झाल्याने हरणा आणि बोरी नदीमधील पाणी प्रवाहात वाढ झाली असून, पूर नियंत्रणासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग आणखी वाढवण्याची शक्‍यता आहे. यासाठी ग्राम स्तरावरील सर्व यंत्रणेमार्फत पूरप्रवण भागातील लोकवस्त्या व गावांमध्ये तातडीने सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात तसेच वित्तहानी आणि जीवितहानी टाळण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

loading image
go to top