esakal | पालकांनो लक्ष ठेवा, आरटीई प्रवेशाची बुधवारी लॉटरी

बोलून बातमी शोधा

images (5).jpg

पहिल्या टप्प्यात सर्व जागांची निवड यादी जाहीर होते. त्यानंतर प्रत्येक शाळांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पाठविले जाते. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ठरावीक मुदत दिली जाते. त्यानंतर ज्यांनी मुदतीत प्रवेश घेतला नाही आणि त्या शाळांमध्ये रिक्‍त जागा आहेत, त्यासाठी दुसरी यादी जाहीर केली जाते. त्यानुसार प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी दिली जाते.

पालकांनो लक्ष ठेवा, आरटीई प्रवेशाची बुधवारी लॉटरी

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-2009 नुसार दरवर्षीप्रमाणे नामवंत खासगी शाळांमधील 25 टक्‍के जागा सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी राखून ठेवल्या जातात. आरटीईअंतर्गत त्यांना संबंधित शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. तत्पूर्वी, एकूण जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांचे दुप्पट अर्ज प्राप्त होतात म्हणून लॉटरीतून त्यांची निवड केली जाते. बुधवारी (ता. 7) लॉटरी निघणार असल्याची माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली.

कोणाची निवड होणार, याची उत्सुकता लागली

पहिल्या टप्प्यात सर्व जागांची निवड यादी जाहीर होते. त्यानंतर प्रत्येक शाळांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पाठविले जाते. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ठरावीक मुदत दिली जाते. त्यानंतर ज्यांनी मुदतीत प्रवेश घेतला नाही आणि त्या शाळांमध्ये रिक्‍त जागा आहेत, त्यासाठी दुसरी यादी जाहीर केली जाते. त्यानुसार प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी दिली जाते.

सोलापूर जिल्ह्यातील 326 शाळांमध्ये आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. या शाळांमध्ये दोन हजार 231 जागा आहेत. मात्र, चार हजार 262 विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज केले आहेत. आता त्यातून कोणाची निवड होणार, याची उत्सुकता लागली आहे. उद्या (बुधवारी) दुपारी तीन वाजल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी संबंधित शाळांच्या वेबसाईटवर टाकली जाणार आहे. तत्पूर्वी, शिक्षणाधिकाऱ्यांकडेही त्याची यादी सोपविण्यात येणार आहे. दुसरीकडे अर्ज केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची लॉटरीतून निवड झाली आहे, त्यांच्या पालकांच्या मोबाईलवरही निवडीचा मेसेज जाणार आहे.

शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार...

  • कोरोनामुळे यंदा लॉटरी प्रक्रिया हॉलमध्ये नव्हे तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार ऑनलाइन
  • बुधवारी दुपारी तीन वाजता शिक्षणाधिकाऱ्यांनी कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हावे
  • पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये; पालकांच्या मोबाईलवर जाणार निवडीचा मेसेज
  • संपूर्ण राज्यभर एकाचवेळी ऑनलाइन पध्दतीने काढली जाणार प्रवेशाची लॉटरी