भाजप आमदाराला धमकी देणारा ‘तो’ कोण? पोलिस म्हणतात, त्या नावाचा व्यक्तीच नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vijaykumar deshmukh
भाजप आमदाराला धमकी देणारा ‘तो’ कोण? पोलिस म्हणतात, त्या नावाचा व्यक्तीच नाही

भाजप आमदाराला धमकी देणारा ‘तो’ कोण? पोलिस म्हणतात, त्या नावाचा व्यक्तीच नाही

सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना ‘पीएफआय’वर बंदी घातल्याच्या रागातून शफी अडनाव असलेल्या व्यक्तीने पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तातडीने गुन्हे शाखा व एटीसीने त्या व्यक्तीचा शोध सुरु केला. पण, सहारा नगर परिसरात त्या नावाचा व्यक्तीच पोलिसांना सापडला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी ‘पीएफआय’वर बंदी आणून मोठी चूक केली आहे. ‘आता खरी जंग सुरु होईल’ म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावे टपालाद्वारे घरपोच पत्र आले. ४ ऑक्टोबरला त्यांना पत्र मिळाले आणि त्यानंतर ५ ऑक्टोबरला आमदार देशमुखांनी पोलिस आयुक्त डॉ. माने यांची भेट घेतली. त्यांनी तातडीने गुन्हे शाखा आणि एटीसीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर धमकी देणारा तो पत्रातील व्यक्ती कोण याचा शोध घेण्णाचे आदेश दिले. त्यानुसार दोन्ही पथकाने त्या व्यक्तीचा शोध घेतला. पण, त्या नावाचा व्यक्ती त्या परिसरात नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता पत्र मुद्दामहून कोणी लिहिले की खरोखरच धमकी देण्यात आली आहे, यादृष्टीने पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. ते पत्र खरे की खोटे, पत्र नेमके कोणी लिहिले हे पोलिसांना काही दिवसांतच सिध्द करावे लागणार आहे.

टपाल खात्याकडून घेतली जाणार माहिती

आमदार विजयकुमार देशमुखांना जीवे मारण्याची धमकी ज्या पत्रातून दिली, त्यात पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही धमकी देण्यात आली आहे. पत्रातील मजकूर गंभीर असल्याने गुन्हे शाखेचे पोलिस आता सोमवारी (ता. १०) टपाल खात्यातून माहिती घेणार आहेत. त्यातून काहीतरी हाती लागेल, असा विश्वास पोलिसांना आहे.