आषाढी यात्रा होणार की नाही? संभ्रम कायम 

Will there be Ashadi Yatra or not Confusion persists
Will there be Ashadi Yatra or not Confusion persists

पंढरपूर (जि. सोलापूर) : आषाढी यात्रेसाठी सुमारे 10 लाखांहून अधिक वारकरी पंढरपूरला येत असतात. राज्यातील सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाची आषाढी यात्रा होणार की नाही, याविषयी संभ्रम आहे. यंदा पालखी सोहळा कशा पद्धतीने व्हावा, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. काही मोजक्‍या मंडळींच्या समवेत पालखी सोहळा परंपरेप्रमाणे व्हावा, असा मतप्रवाह आहे, तर पालख्या थेट पंढरपूरला वाहनातून आणल्या जाव्यात, अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या सूचना पुढे येत आहेत. यासंदर्भात विचारविनिमयासाठी 3 मे रोजी पंढरपुरात बैठक होणार आहे. 
आषाढी यात्रेत चुरमुरे, बत्तासे, पेढे, फोटोफ्रेम, सोलापुरी चादरी, घोंगडी, विविध प्रकारच्या मूर्ती, खेळणीची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. हॉटेल, लॉज, धर्मशाळा, घरांमधून वारकऱ्यांच्या राहण्याची सोय करून चार पैसे मिळवणारे स्थानिक नागरिक अशा सर्वांना सद्य परिस्थितीमुळे आषाढीची काळजी लागली आहे. आषाढीला सुमारे 10 लाख लोक येतात. आलेल्या प्रत्येक व्यक्तीने पंढरपुरात कमीत कमी 200 रुपये खर्च केले असे गृहीत धरले तर त्या माध्यमातून सुमारे 20 कोटी रुपयांची उलाढाल होते. यात्रेसाठी सुमारे एक ते दीड महिना आधीपासून अनेक व्यापारी तयारी करत असतात. पालखी मार्गावरील गावांमधून देखील पालख्यांमधील वारकऱ्यांच्या माध्यमातून खरेदी-विक्री होत असते. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता यात्रेची तयारी करायची किंवा नाही, याविषयी या सर्वच व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. 
सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होणारी आणि पंढरपूरच्या अर्थकारणात अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी आषाढी यात्रा भरू शकली नाही तर करायचे काय, अशी चिंता स्थानिक व्यापारी आणि यात्रेवर अवलंबून असलेल्या बहुतांश पंढरपूरकरांना लागली आहे. 
स्थानिक व्यापाऱ्यांबरोबरच यात्रेत एसटी आणि रेल्वे प्रशासनाची भूमिका देखील महत्त्वाची असते. त्यांनासुद्धा एक महिनाआधीपासून तयारी करावी लागते. शासनाकडून निर्देश मिळाल्याशिवाय त्यांनाही तयारीचे नियोजन करता येणार नाही. 
कोरोनाच्या संकटामुळे श्री विठ्ठल मंदिर 17 मार्चपासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी चैत्री यात्रेला भाविकांनी पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने आणि प्रमुख वारकरी महाराज मंडळींनी केले होते. त्याला प्रतिसाद देत एकही वारकरी चैत्री यात्रेसाठी पंढरपूरला आला नाही. 

कोरोनाचे संकट दूर होण्याची वारकऱ्यांना आशा 
कोरोनाचा संसर्ग येत्या काही दिवसांत कमी झाला तर आषाढी यात्रेचा विचार होऊ शकेल; अन्यथा गर्दीमुळे संसर्ग पुन्हा पसरू नये यासाठी धोका न पत्करता यंदाच्या आषाढीला देखील चैत्री यात्रेप्रमाणे कोणीही वारकऱ्यांनी पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन शासन, पालखी सोहळ्याचे प्रमुख, महाराज मंडळी या सर्वांना करावे लागणार आहे. तशी वेळ येऊ नये. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना वारकरी, स्थानिक व्यापारी आणि नागरिक करत आहेत. 

"सर्वसहमतीने शासनाला प्रस्ताव दिला जाईल' 
दरवर्षी चैत्र शुद्ध दशमी रोजी आषाढी यात्रेच्या नियोजनाच्या संदर्भात श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या प्रमुख महाराज मंडळींची बैठक पंढरपुरात होत असते. आळंदी संस्थानचे विश्‍वस्त, आरफळकर मालक, शितोळे सरकार, वासकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होत असते. कोरोनाच्या संकटामुळे ती बैठक रद्द करावी लागली. आता 3 मे रोजी पंढरपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. सध्याच्या जिल्हा बंदीच्या अडचणीमुळे जर पालखी सोहळ्याचे प्रमुख पदाधिकारी पंढरपूर येथे येऊ शकले नाहीत तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला जाईल. 
परिस्थितीचा सांगोपांग विचार करून सर्वसहमतीने प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर केला जाईल व त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार अंतिम निर्णय होईल, अशी माहिती वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवव्रत तथा राणा महाराज वासकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com