नियम पाळूनच जिंकू कोरोनाविरुध्दची लढाई ! 'कॉफी विथ सकाळ'मध्ये पोलिस अधीक्षक सातपुतेंनी व्यक्‍त केला विश्‍वास

IMG-20210314-WA0300.jpg
IMG-20210314-WA0300.jpg

सोलापूर : आतापर्यंतच्या लढायांमध्ये सर्वाधिक जिवितहानी कोरोना महामारीमुळेच झाली आहे. कोरोनाविरुध्दची लढाई ही आपण सर्वजण नियमांचे काटेकोर पालन करूनच जिंकू. कोरोनाची प्रतिबंधात्मक लस टोचल्यानंतरही काळजी घेतल्यास निश्‍चितपणे कोरोना होणार नाही, असा विश्‍वास पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 'कॉफी विथ सकाळ'मध्ये व्यक्‍त केला. तत्पूर्वी, 'सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले.

पुढील काळात माझे हेच धेय्य... 

  • ग्रामीण पोलिसांना सर्व कौटुंबिक वस्तू एकाच छताखाली मिळाव्यात म्हणून पंढरपुरात पोलिस कॅन्टीन सुरु करणे 
  • वाढदिवस असलेल्या कर्मचाऱ्यांना तो दिवस त्याच्या कुटुंबियांसमवेत घालविण्यासाठी दिली जाईल सुट्टी 
  • कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्या सोडविण्यासाठी त्यांना वेळ देणे 
  • पोलिस दलाची प्रतिमा उंचावणाऱ्यांना प्रोत्साहन देणे तर पोलिस ठाण्यातील गुप्त माहिती बाहेर देण्यांवर कडक कारवाई करणे 
  • दारु निर्मितीत प्रसिध्द असलेल्या मुळेगाव तांड्याची ओळख बदलण्याचा असेल प्रयत्न 


कोरोना काळात मास्क न घालणाऱ्यांचा दंड शंभर रुपयांवरून पाचशे रुपयांपर्यंत वाढविला. मात्र, बहुतांश जणांकडे दंडाची रक्‍कम भरायलासुध्दा पैसे नाहीत. ग्रामीण भागात मास्कचा वापर असो वा सोशल डिस्टन्सिंगचे पालन तंतोतंत होताना दिसत नाही. कोरोनामुळे संपूर्ण जगाल वेढा दिला आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली, तरीही लस घेतल्यानंतर 100 टक्‍के कोरोना होणारच नाही, असे कोणीही खात्रीशीर सांगू शकत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या ट्रेण्डला ही लस उपायकारक आहे का, याबद्दलही संभ्रम आहे. त्यामुळे या विषाणूविरुध्दची लढाई जिंकण्यासाठी नागरिकांनी दंड भरण्यापेक्षा नियमांचे पालन करणे हाच एकमेव पर्याय आहे, असेही सातपुते यांनी यावेळी सांगितले. माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार या मोहिमांची प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येकांनी सामाजिक बांधिलकीतून काम करायला हवे, असेही त्या म्हणाल्या. 

कोरोना काळात वाढले नवे गुन्हेगार 
चोरी असो वा अन्य कोणत्याही प्रकारचा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराचे काहीतरी वैशिष्ट्ये असते. त्याची पडताळणी मोडस ऑपरेटिंग सिस्टिमनुसार (पोलिस गुन्ह्याची माहिती एलसीबीच्या पथकाला देतात आणि गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्हेगारांची ठळक वैशिष्ट्ये सांगून हे पथक चोरापर्यंत पोहचण्याचा मार्ग दाखविते.) केली जाते. मात्र, कोरोना काळात मोडस ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर करुनही गुन्हेगारांचा शोध घेण्यात अपेक्षित यश आले नाही. त्याचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की, लॉकडाउन काळात परगावी गेलेले अनेकजण परत मूळगावी आले. सुमारे तीन लाखांपर्यंत लोक कोरोना काळात जिल्ह्यात परतल्याची माहिती आहे. चोरीसह अन्यप्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अलिकडे नव्या गुन्हेगारांचा समावेश झाल्याचे समोर आले आहे. परंतु, गुन्हेगारीचा शेवट हा वाईटच होतो आणि म्हणून कष्टाचे जीवन कधीही अधिक चांगले असते. त्यातूनच कुटुंबाबरोबरच स्वत:च्या प्रगतीचा मार्ग सापडेल म्हणून गुन्हेगारी सोडावी. तर नागरिकांनीही स्वत:च्या संपत्तीची व जिविताची सतर्क राहून काळजी घ्यावी, असा सल्ला पोलिस अधीक्षकांनी यावेळी दिला. 



पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांना मोलाचा सल्ला 

  • नागरिकांसाठी तुम्ही आहात, तुमच्यासाठी ते नसून पोलिस ठाण्यात आलेल्यांची कामे तत्काळ मार्गी लावा 
  • अवैध व्यवसाय करणाऱ्या कोणाशीही मैत्री चालणार नाही; सिस्टिमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती नको 
  • अवैध व्यवसायात कोणत्याही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्याची भागिदारी नकोय 
  • दुसऱ्याच्या नावावर स्वत:चा अवैध व्यवसाय सुरु करणाऱ्यांवर असेल कायमस्वरुपी वॉच 
  • पोलिस अंमलदार हाच पोलिस दलाचा खरा हिरो; त्यांच्यावर समाजातील शांतता, सुव्यवस्था अवलंबून असल्याने त्यांचे काम प्रामाणिक हवे 
  • राष्ट्रीय अथवा राज्य महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनांना विनाकारण अडवून त्रास देऊ नये; पोलिसांची बदनामी होईल, असे कृत्य नकोय 


पोलिस ठाण्यांच्या विभाजनाचा प्रस्ताव 
सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 25 पोलिस ठाणे आहेत. मात्र, एका पोलिस ठाण्यांतर्गत सुमारे 150 ते 200 गावे आहेत. सध्या ग्रामीण पोलिस दलात दोन हजार 300 कर्मचारी आणि 150 अधिकारी आहेत. वाहतूक शाखेंतर्गत 30 कर्मचारी काम करतात. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना प्रशासकीयदृष्ट्या चांगली सेवा देता येईल, पोलिसांच्या कामात आणखी सुसूत्रता येईल म्हणून सांगोला, करमाळा, मंगळवेढा, तालुका पोलिस ठाण्यांतर्गत आणखी एक पोलिस ठाणे सुरु करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पोलिस महासंचालकांची मान्यता मिळाल्यानंतर पोलिस ठाण्यांचा विस्तार शक्‍य होईल, असेही सातपुते म्हणाल्या. दुसरीकडे सध्या जी गावे शहरीकरण झाली आहेत, त्या गावांचा समावेश शहरात करण्यासंदर्भात आम्ही अभिप्राय दिल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com