esakal | "दामाजी'च्या मदतीला "विठ्ठल' आला अन्‌ भूमिपुत्र आमदार झाला !
sakal

बोलून बातमी शोधा

Awtade_Paricharak

"दामाजी'च्या मदतीला "विठ्ठल' आला अन्‌ भूमिपुत्र आमदार झाला !

sakal_logo
By
महेश पाटील

सलगर बुद्रूक (सोलापूर) : मंगळवेढा ही संतांची भूमी तर पंढरपूर ही देवभूमी म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. पंढरीच्या पांडुरंगाचा आशीर्वाद हा दामाजीपंतांना होता, हे सर्व विख्यात आहे. दरम्यान, आता झालेल्या पोटनिवडणुकीत हीच प्रचिती सर्वांना आली. अखेर मंगळवेढ्याचा भूमिपुत्र आमदार व्हावा म्हणून दोन नंबरची मते घेणाऱ्या परिचारक कुटुंबीयांनी आवताडेंच्या आमदारकीसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली व फडणवीसांना दिलेला शब्द खरा करून दाखवला. त्यामुळे आताही भूमिपुत्र आमदार होण्यापाठीमागे परिचारकांची साथ मिळाली, हीच बाब महत्त्वाची असल्या कारणाने परत एकदा दामाजीपंतांच्या मदतीला विठ्ठल धावून आला, अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. (With the help of Pandharpurs Prashant Paricharak Samadhan Avtade became the MLA)

दरम्यान, मंगळवेढ्याचा आमदार हा इथला भूमिपुत्रच असावा, भूमिपुत्र आमदारच इथल्या समस्या खऱ्या अर्थाने सोडवू शकेल, अशी भावना जोपासणाऱ्या मंगळवेढेकरांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. हे स्वप्न पूर्ण व्हायला चाळीस वर्षे उलटली व मंगळवेढ्याचे पहिले भूमिपुत्र आमदार कै. कि. रा. मर्दा ऊर्फ मारवाडी वकील यांच्यानंतर समाधान आवताडे यांच्यासारखे नेतृत्व तयार होऊन आमदार व्हायला एका पिढीचे राजकारण संपून नवीन पिढीचा उदय या संतांच्या भूमीत होण्याची वेळ आली.

हेही वाचा: कोणी काही म्हणो, जिल्ह्याचे नेतृत्व मोहिते-पाटीलच करू शकतात !

अपयशाकडून यशाकडे असा प्रवास

2014 च्या विधानसभेवेळी समाधान आवताडे यांनी पहिल्यांदा आमदारकी लढवली. त्या वेळीही भूमिपुत्र आमदार व्हावा म्हणून भरघोस मतदान आवताडेंना मिळाले; पण पंढरपूरमधून मतदारांनी नाकारल्यामुळे त्यांची संधी हुकली व भारत भालके हे दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यानंतर खचून न जाता कार्यकर्त्यांची मोट बांधून मंगळवेढ्यातील जनतेशी असलेला संपर्क वाढवून, समाजकारण करत करत शंभर टक्के राजकारण चालू केले. मग त्यानंतर 2016 मध्ये भालकेंकडून कारखाना ताब्यात घेतला. तर त्यापाठोपाठ 2017 मध्ये मंगळवेढा पंचायत समितीवरही आवताडे गटाचा झेंडा फडकावला. शिवाय झेडपीतही मंगळवेढ्यातील चार पैकी तीन जागांवर विजय मिळवला व त्या जिल्हा परिषद सदस्यांपैकी एकाला समाजकल्याण सभापती तर दुसऱ्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच आरोग्य सभापती ही पदे आपल्या शिलेदारांना मिळवून दिली. मंगळवेढा नगरपालिकेतही नगरसेवक निवडून गेले. त्यानंतर परत आवताडेंनी 2019 ची विधानसभा लढवली व परत व्हायचे तेच झाले.

या निवडणुकीत भालके व परिचारक यांच्यापेक्षा भूमिपुत्र म्हणून मंगळवेढ्यातील जनतेने समाधान आवताडे यांना एक नंबरची मते दिली. पण पुन्हा पंढरपुरातून मतदारांनी हुलकावणी दिली. पण आमदार व्हायचं हे स्वप्न उराशी बाळगलेल्या समाधान आवताडेंना पोटनिवडणुकीमुळे पुन्हा एकदा आमदार व्हायची संधी चालून आली व या वेळेस मात्र मंगळवेढ्याच्या मतदारांबरोबरच पंढरपूरच्या मतदारांनी मताचे दान आवताडेंच्या पारड्यात टाकले. यात परिचारकांची भूमिका जरी महत्त्वाची असली तरी जिद्द व चिकाटीच्या जोरावर आवताडेंनी भूमिपुत्र आमदार होऊन मंगळवेढेकरांचे स्वप्न पूर्ण केले असेच म्हणावे लागेल.

loading image
go to top