शेतीच्या बांधावर फुलविला साहित्याचा मळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ujjawala Shinde

शेतात स्वतः काबाड कष्ट करून संसाराचा गाडा चालवणाऱ्या भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथील उज्ज्वला शिंदे यांनी शेतीच्या बांधावर देखील तितक्याच निष्ठेने आणि जिद्दीने साहित्याचा मळा फुलविला आहे.

Womens Day Special : शेतीच्या बांधावर फुलविला साहित्याचा मळा

पंढरपूर - शेतात स्वतः काबाड कष्ट करून संसाराचा गाडा चालवणाऱ्या भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथील उज्ज्वला शिंदे यांनी शेतीच्या बांधावर देखील तितक्याच निष्ठेने आणि जिद्दीने साहित्याचा मळा फुलविला आहे. अवघ्या दोन वर्षात त्यांचे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. शिवाय आकाशवाणी आणि वर्तमान पत्रातून त्यांच्या अनेक कवितांसह इतर शेती विषयक साहित्य प्रसिद्ध झाले आहे. शेतात राबून कवितेची आवड जोपासणाऱ्या उज्ज्वला शिंदे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

भंडीशेगाव येथे उज्ज्वला शिंदे आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. पती लहू शिंदे औषध दुकानात काम करतात. तर उज्वला स्वतः शेतात काम करतात. त्यांना स्वतःची बाजीराव विहीरी जवळ कोरडवाहू दोन एकर शेती आहे. शेतीत जेमतेम पाणी असल्याने रब्बी आणि खरीप पिके घेतात. पिकांना पाणी देणे, पिकांची खुरपणी, काढणी, फवारणी ही सगळी कामे मजूर न लावता त्या स्वतः करतात, शेतीतून आलेल्या उत्पन्नावर त्या आपल्या संसाराचा गाडा हाकतात. शेतीच्या कामातून मिळालेल्या वेळेत त्यांनी साहित्याची आवड जोपासली आहे.

लॉकडाऊनमध्ये रिकाम्या वेळेत त्यांनी कविता लिहिण्यास सुरवात केली. कविता लिहिण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली. शेतकऱ्यांची दिवाळी ही पहिली शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालणारी कविता‌ सकाळ अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. तेव्हापासून त्यांना कवितेचा छंद अधिकच जडला. अवघ्या दोन वर्षात उज्ज्वला शिंदे यांचे शब्दांची नम्रता हा कविता संग्रह आणि एक अभंग संग्रह असे दोन संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. शेती आणि शेतकऱ्यांचे समग्र जीवन वास्तवदर्शी मांडणाऱ्या त्यांच्या अनेक कविता वर्तमान पत्रातून व आकाशवाणीवरून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या कुणब्याचं पोर, फास, शेतकरी धोक्यात अशा शेतकऱ्यांची व्यथा मांडणाऱ्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.

‘अॅग्रोवन’च्या दिवाळी अंकात पहिली कविता

‘शेतकऱ्यांची दिवाळी’ ही पहिली शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालणारी कविता‌ सकाळ ‘अॅग्रोवन’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. तेव्हापासून त्यांना कवितेचा छंद अधिकच जडला.

शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय कविता...

जगणं शेतकऱ्याचे सोप नाही आता, कोण विचारतो तुम्ही फास का घेता?

तुम्ही फक्त जय जवान, जय किसान घोषणाच देता

भाव वाढीच्या बातम्या पेपरला देता, स्वस्त झाला कांदा का गप्प बसता?

दहा रुपयांची भाजी दोन रुपयात मागता,

दर वाढला शेतमालाचा की लगेच रस्त्यावर उतरता

सगळे जण शेतकऱ्यांना लुटता, यंदा शेतकरी आहे धोक्यात

पिकं गेली सारी पुरात, दुःख सरले माईना उरात,

सावकार बसलाय दारात, नव्या बळानं उभा आहे रानात

का चाललाय शेतकरी तोट्यात, गाईच उरल्या नाहीत गोठ्यात

उभा करा बळिराजा थाटात, आता सगळचं आहे हातात...