esakal | यंदा दिवाळी दोनच दिवस : नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन शनिवारी तर पाडवा व भाऊबीज सोमवारी 
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali.jpeg

शुक्रवारी (ता.13) धनत्रयोदशी आहे. शनिवारी (ता.14) नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आहे. तर एक दिवस सोडून सोमवारी (ता.16) दिवाळी पाडवा व भाऊबीज हेही एकाच दिवशी आहेत.

यंदा दिवाळी दोनच दिवस : नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन शनिवारी तर पाडवा व भाऊबीज सोमवारी 

sakal_logo
By
श्याम जोशी

दक्षिण सोलापूर ः नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज अशी किमान चार दिवसाची दिवाळी यंदा मात्र दोनच दिवसात आटोपणार आहे. त्यामुळे घराघरातील दिवाळीचा आनंद यंदा दोनच दिवसावर सिमीत झाला आहे. 

वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आनंददायी मानला जातो. नरक चतुर्दशी ते भाऊबीज या चार दिवसांत मौजमजा करावी, गोडधोड खावे, आनंदी रहावे अशी बळीराजाची इच्छा आणि त्याला मिळालेला वर यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व आहे. यावर्षीच्या दिवाळीबाबत पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले, "यंदा मुख्य दिवाळी शनिवारी व सोमवारी असे दोनच दिवस आहे. गुरूवारी (ता.12) वसुबारसेपासून दिपोत्सव सुरू होत आहे. 

शुक्रवारी (ता.13) धनत्रयोदशी आहे. शनिवारी (ता.14) नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आहे. तर एक दिवस सोडून सोमवारी (ता.16) दिवाळी पाडवा व भाऊबीज हेही एकाच दिवशी आहेत. दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून काश्‍मीर ते कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात दीपोत्सव केला जातो. घर, दुकानांची स्वच्छता, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, अभ्यंगस्नान, आप्तेष्टांनी एकत्र येणे आदी गोष्टी केल्या जातात. पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात व कुटुंबात एकोपा राखला जातो.' 

वसुबारस 
वसुबारस गुरूवारी (ता.12) आहे. या दिवशी कुटूंबियांसह सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह गाईचे पूजन केले जाते. यावेळी "हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर' अशी प्रार्थना केली जाते. 

धनत्रयोदशी व यमदीपदान 

धनत्रयोदशी शुक्रवारी (ता.13) आहे. या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने-नाणे स्वच्छ केले जातात. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यू म्हणजेच अकाली, अपघाताने मृत्यू येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवला जातो. यावेळी "मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्‍यामयासह । त्रयोदश्‍यां दीपदानात्‌ सूर्यजः प्रीयतां मम ।।' हा श्‍लोक म्हणून प्रार्थना केली जाते. 

नरक चतुर्दशी 

नरकचतुर्दशी शनिवारी (ता.14) आहे. प्रजेचा छळ करून 16 हजार 108 स्त्रियांना बंदी केलेल्या नरकासूराचा यादिवशी भगवान श्रीकृष्णांनी वध करून त्यांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाला मागितलेल्या वरानुसार या तिथीला मंगलस्नान करणाऱ्यास नरकाची पीडा होत नाही असे मानले जाते. त्यामुळे पहाटे अभ्यंगस्नान केले जाते. शरद्‌ ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळी असते. त्यामुळे येथून पुढे थंडीत तेल लावून स्नान करण्याची सुरुवात होते. यादिवशी अपमृत्यु निवारणासाठी यमाची प्रार्थना करून यमतर्पणही केले जाते. 

लक्ष्मीकुबेर पूजन 

शनिवारी (ता.14) लक्ष्मीपूजनही आहे. व्यापाऱ्यांसाठी दिवाळीची अमावास्या शुभ मानली आहे. या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते असे मानले जाते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी लक्ष्मी आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धिसाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. 

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) 

दिवाळी पाडवा सोमवारी (ता.16) आहे. या दिवशी दानशूर बळीराजाची पूजा सांगितली आहे. यादिवशी विक्रम संवत्सराची सुरवात होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळण्याची प्रथा आहे. 

यमद्वितीया (भाऊबीज) 
भाऊबीजही सोमवारी(ता.16)च आहे. यादिवशी यमराजाने बहिणीच्या हातचे भोजन घेत तिचा सत्कार केल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे यादिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे, असे सांगितले आहे. 

दिवाळीतील मुहूर्त 
लक्ष्मीपूजन मुहूर्त (14 नोव्हेंबर 2020) 
दुपारी 1:50 ते दुपारी 4:30, सायंकाळी 6 ते रात्री 8:25, रात्री 9 ते रात्री 11:20  वहीपूजन मुहूर्त (16 नोव्हेंबर 2020) 
पहाटे 2 ते 3:35, पहाटे 5:15 ते 8, सकाळी 9:30 ते 11 

संपादन : अरविंद मोटे 

loading image
go to top