सुधारित वाण व आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर हुरडा शेतीतून युवक शेतकरी घेताहेत लाखोंचे उत्पादन !

Hurda
Hurda
Updated on

मळेगाव (सोलापूर) : बार्शी-सोलापूर रोडवरील वैरागपासून आठ किमी अंतरावर असलेल्या पिंपरी (सा) येथील युवकाने पारंपरिक शेतीला फाटा देत सुधारित बियाणे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत हुरडा शेतीतून सव्वा लाखाचे उत्पादन घेत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे काळेगावचे शेतकरी नानासाहेब घायतिडक यांनी सलग तीन वर्षे अत्यंत कमी खर्चात हुरडा शेतीतून दोन लाखांपेक्षा जास्त उत्पादन घेतले आहे. एकूणच, सोलापूर जिल्ह्यातील लुसलुशीत हुरड्याची लज्जत वाढत असून, युवक व शेतकऱ्यांना अर्थार्जनाचा मार्ग दिसला आहे. 

हिंगणी प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या पिंपरी गावचा शेतशिवार खात्रीशीर व कायमस्वरूपी जलसाठ्यामुळे द्राक्ष, ऊस, सीताफळ, ज्वारीच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. बीएपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या संतोष बळिराम काटमोरे या युवकाने आपल्या वडिलोपार्जित पाच एकर शेतीत सोयाबीन, हरभरा, हुरडा शेतीचा यशस्वी प्रयोग राबवून नोकरीच्या मागे धावणाऱ्या युवकांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. संतोष काटमोरे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले मधुरा वाणाची दहा गुंठ्यांत लागवड केली. कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरचे प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे, विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री, जवळगे, कृषी सहाय्यक विनोद जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा गुंठ्यांत एक लाख वीस हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी पुणे-मुंबईसारख्या शहरात जाऊन तटपुंज्या पगारावर नोकरी करण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने केल्या जणाऱ्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची व सुधारित वाणांची जोड दिल्यास विक्रमी उत्पादन घेता येते, हे पिंपरी (सा) गावचे युवक संतोष काटमोरे, ढोराळे गावचे युवक अमोल काकडे व काळेगावचे शेतकरी नानासाहेब घायतिडक यांनी दाखवून दिले आहे. 

काळेगावचे शेतकरी नानासाहेब घायतिडक यांनी सलग तीन वर्षे अत्यंत कमी खर्चात हुरडा शेतीतून दोन लाखांपेक्षा जास्त उत्पादन घेतले आहे. गेल्या तीन वर्षात पिंपरी, ढोराळे व काळेगावच्या कोवळ्या, लुसलुशीत व गोड हुरड्याची चव महाराष्ट्रभर पोचली आहे. वाढलेल्या थंडीमध्ये व तापलेल्या राजकीय वातावरणात जागोजागी हुरडा पार्टीने जोर धरला आहे. त्यामुळे अनेक हॉटेल मालक, कृषी पर्यटन केंद्र, नागरिक शेतकऱ्यांच्या शेतातून 240 रूपये किलो दराने शेतकऱ्यांचा हुरडा विकत घेत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. 

बार्शी तालुका हा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो. नवनवीन प्रयोगांमुळे व ज्वारीच्या सुधारित वाणामुळे तालुक्‍याची एक वेगळी ओळख निर्माण होत आहे. बार्शी तालुक्‍यातील पिंपरी, साकत, ढोराळे, काळेगाव, मळेगाव येथे हुरडा शेतीचा प्रयोग राबविला जात आहे. हुरडा शेतीसाठी वेळ व श्रम कमी लागतो, कमी भांडवल, मोजके पाणी व योग्य नियोजन केल्यास कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेता येते. तसेच जनावरांसाठी कडबा शिल्लक राहतो व 100 रुपये किलो दराने हुरडा बी देखील विकले जाते. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सुधारित बियाणे व तंत्रज्ञानाची सांगड घातल्यास अधिकचे उत्पादन घेता येते. 
- संतोष काटमोरे, 
शेतकरी, पिंपरी (सा) 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

6,000 Litres of Fuel a Year! Know the Official Facilities for Solapur ZP President
Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Marathi News Esakal
www.esakal.com