
सांगोला, परांड्यात धडाडणार युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंची तोफ
सोलापूर - शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना पदावरून पायउतार व्हावे लागले. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे ‘निष्ठा यात्रे’च्या माध्यमातून बंडखोर आमदार, खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकारी व जनतेशी संवाद साधत आहेत. सातारा, कोल्हापूर दौऱ्यानंतर ते सांगोला, परंड्यातही येणार आहेत.
माजी मंत्री छगन भुजबळ, ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडून बंडखोरी केली. पण, त्यांच्या तुलनेत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. शिंदे यांनी बंडखोर आमदारांच्या मदतीने काही पदाधिकारीही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रेतून राज्यभर विशेषत: ४० आमदार आणि १२ खासदारांच्या मतदारसंघात फिरत आहेत. आता ते कोल्हापूर व साताऱ्यात जाणार आहेत. त्यानंतर ते ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ म्हणत देशभर चर्चेत आलेल्या आमदार शहाजी पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात येणार आहेत. त्यानंतर ते माजी मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्या परंडा मतदारसंघातसुद्धा जाणार आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले सावंत हे शिंदे गटातील प्रमुख आमदार आहेत.
‘सोलापूर’मध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी नाहीत
शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कार्यकारिणी जाहीर केली. अनेक जिल्ह्यांतील शिवसेनेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश करण्यात आला. पण, सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या एकाही पदाधिकाऱ्याला त्यांच्या नवीन कार्यकारिणीत संधी मिळालेली नाही. सोशल मीडियात समर्थन पत्र पाठवून अनेकांना मुख्यमंत्री शिंदेंना समर्थन देण्याचे आवाहन करणाऱ्या माजी सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनाही नवीन कार्यकारिणीत संधी मिळालेली नाही.
Web Title: Yuva Sena Chief Aditya Thackerays Samvad Yatra At Sangola Paranda
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..