ऑनलाईन पैसे स्वीकारण्यास काही रुग्णालयांमध्ये नकार

अजित झळके 
Monday, 12 October 2020

कोरोनासह अन्य उपचारांसाठी काही रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या बिलांबाबत नातेवाईकांकडून सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यात काही रुग्णालयांनी ऑनलाईन पैसे स्वीकारण्यास नकार देत त्यात भरच घातली आहे.

सांगली : कोरोनासह अन्य उपचारांसाठी काही रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या बिलांबाबत नातेवाईकांकडून सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यात काही रुग्णालयांनी ऑनलाईन पैसे स्वीकारण्यास नकार देत त्यात भरच घातली आहे. बिलांबाबत शंका नसतील तर रोखीत पैशांची मागणी कशासाठी, असा सवाल पुढे आला आहे. 

काही रुग्णांच्या नातेवाईकांनी "सकाळ'शी संपर्क साधून या गोष्टीकडे लक्ष वेधले. देशात ऑनलाईन बॅंकिंगला प्राधान्य दिले जात आहे. अनेक लोक मोबाईलद्वारे ऑनलाईन आर्थिक व्यवहार सर्रास करत आहेत. रोखीत पैसे सांभाळण्यापेक्षा हे सोपे आहेच, शिवाय काळजी घेतली तर सुरक्षितही. त्यामुळे रुग्णालयांत रुग्णाचे बिल भरताना ऑनलाईन पैसे द्यायचे आहेत, असे सांगितल्यानंतर काही रुग्णालयांनी त्याबाबत असमर्थता दर्शवल्याची उदाहरणे पुढे आली आहेत. काही ठिकाणी तर हे पैसे रोखीत भरा, बाकीचे ऑनलाईन दिले तरी चालतील, असे दोन टप्पे पाडले आहेत. त्यामुळे या साऱ्या व्यवहाराबाबत गोंधळाची आणि संशयाची स्थिती आहे. 

कोविड रुग्णांचे बिल देतानाही त्यात स्पष्टता दिसत नाही. त्याचे ऑडिट करतानाही पुन्हा पुन्हा त्याची स्पष्टता समजून घ्यावी लागत आहे. "लॅब चार्जेस' नावाचा एकच रकाना दिसतोय. त्यात नेमके काय केले, याची स्पष्टता नसल्याचे रुग्णाचे नातेवाईक सांगतात. ऑक्‍सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, जनरल वॉर्ड... रुग्णांना नेमके कुठे, किती दिवस ठेवले याचा हिशेब नातेवाईकांना मिळत नाही. अर्थात, या आधी असा हिशेब रुग्णालयांकडून कधीच मागितला गेला नव्हता. यावेळी साथीचा आजार असल्याने वैद्यकीय सेवेचे ऑडिट होतेय आणि त्यातून अनेक संशयास्पद बाबी समोर येत आहेत. काही हजारांत बिले परत परत दिली गेली आहेत. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some hospitals refuse to accept money online