बेळगावात पांडुरंगाचे दर्शन होणार घरातूनच ; आषाढीनिमित्त विषेश पूजेचे आयोजन....

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जून 2020

घरातूनच घ्यावे लागणार पांडुरंगाचे दर्शन, एकादशी दिवशीही शहरातील काही मंदिरे बंदच.... 

बेळगाव  : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारा विठुरायाचा जयघोष यावेळी कोरानाच्या संकटामुळे ऐकू येणार नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे मंदिरामध्ये गर्दी होऊ नये यासाठी शहरातील काही मंदिरे आषाढी एकादशीलाही बंदच राहणार आहेत. तर काही मंदिरामध्ये सामाजिक अंतर राखून दर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी घरातूनच पांडुरंगाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. एकादशीनिमित्त शहरातील मंदिरांवर रोषणाई केली असून मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. 

साहित्य खरेदीसाठी गर्दी 

दरवर्षी आषाढी एकादशीला बेळगाव आणि सीमाभागातून हजारो वारकरी व भावीक पंढपूरला रवाना होतात. यावेळी मात्र दिंडी सोहळेही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळी भाविकांना विठुरायाच्या दर्शनापासून वंचीत रहावे लागणार आहे. शहरातील 
भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहापूर येथील विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देवस्थानचे मंदार देवूळकर यांनी दिली. मात्र मंदिरात दैनंदिन पूजा सुरू राहणार आहे. तसेच पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धूपारती व शेजारती व चंदनउटी पूजा परंपरेनुसार करण्यात येत आहे. मात्र हजारो भाविकांना विठ्ठल दर्शनाला मुकावे लागणार आहे. 

हेही वाचा- सावधान ; आंबोलीत जाताय  ; पोलिसांच्या या कारवाईला जावे लागणार सामोरे... -

येथे होणार आषाढीनिमित्त विषेश पूजा

राजवाडा कपांऊड येथील ज्ञानेश्‍वर मंदिर, चावडी गल्ली येथील विठ्ठल मंदिर, यरमाळ रोड येथील विठ्ठल मंदिर, नामदेव दैवकी विठ्ठल मंदिरासह इतर मंदिरामध्येही आषाढीनिमित्त विषेश पूजा करण्यात येणार आहे. एकादशीनिमित्त विठुरायाची आकर्षक आरास केली जाणार असून मंदिरेही सजविण्यात आली आहेत. परंतू यावेळी भाविकांना घरातूनच एकादशी साजरी करावी लागणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त विविध प्रकारच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी मंगळवारी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some temples in the city are closed even on the eleventh day in belgaum