उदं उदं बोला, "स्लीपर कोच'नं सहलीला चला...! 

संभाजी गंडमाळे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

सात डिसेंबरपासून कोल्हापूरकरांच्या या आनंदोत्सवाला प्रारंभ होणार असून दहा जानेवारीपर्यंत विविध सहलींच्या निमित्ताने वर्षभर हाडाची काडं करून राबणारे सामान्य कोल्हापूरकर पर्यटनाचा आनंद घेणार आहेत. 

कोल्हापूर - सरत्या वर्षाला निरोप देताना कोल्हापूरकरांचा अध्यात्मिक आनंदोत्सव यंदाही साजरा होणार आहे. सौंदत्ती यात्रेबरोबरच अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांची संख्याही यंदा वाढली असून सौंदत्तीसाठी यंदा पहिल्यांदाच स्लीपर कोच एअर कंडीशन्ड्‌ (एसी) बसचे बुकींग झाले आहे. 

सात डिसेंबरपासून कोल्हापूरकरांच्या या आनंदोत्सवाला प्रारंभ होणार असून दहा जानेवारीपर्यंत विविध सहलींच्या निमित्ताने वर्षभर हाडाची काडं करून राबणारे सामान्य कोल्हापूरकर पर्यटनाचा आनंद घेणार आहेत. 

यंदाही विविध ठिकाणी सहली

पूर्वापार परंपरा असलेल्या सौंदत्ती यात्रेच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांत देशभरातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्याची संकल्पना पुढे आली आणि ती यशस्वीही ठरली. यंदाही सौंदत्तीसह मंगसुळी, विजापूर, अलमट्टी, बदामी, कुडलसंगम, उडुपी, मंत्रालय, श्रवणबेळगोळ, धर्मस्थळ, मुरडेश्‍वर, पंढरपूर, अक्कलकोट, हैदराबाद फिल्मसिटी, दक्षिण भारत अशा विविध ठिकाणी सहली होणार आहेत. 

एक जानेवारीला व्यसनमुक्तीची शपथ

पंढरपूरच्या धर्तीवर अक्कलकोटची पायी वारी ही संकल्पनाही आता शहरात रूजते आहे. अशा पायी वारी नुकत्याच रवाना झाल्या आहेत. त्याशिवाय दोन दशकांपासूनची अनोखी अक्कलकोट वारीची परंपरा यंदाही जपली जाणार आहे. अर्थात, नववर्षाचे संकल्प करताना आध्यात्मिक आनंदासह देशभरातील तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळांना भेट दिली जाणार आहे. यंदाही गंगावेस, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, संभाजीनगर-मगरमठी, विक्रमनगरातील स्वामी समर्थभक्त 31 डिसेंबरच्या रात्री अक्कलकोट येथे भजनात तल्लीन होणार आहेत. आध्यात्मिक आनंदात सरत्या वर्षाला निरोप देत 1 जानेवारीला उगवत्या सूर्याच्या साक्षीने व्यसनमुक्तीची शपथही घेतली जाणार आहे. यंदाही गंगावेस येथील स्वामी समर्थ भक्त अक्कलकोटसह विविध तीर्थक्षेत्रांना भेट देणार आहेत. यंदा अक्कलकोटसह सव्वीस स्थळांचा समावेश असलेल्या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवसांची ही सहल असेल. 

कोल्हापूरची यात्रा 

सौंदत्तीवर होणाऱ्या यात्रेची कोल्हापूरची यात्रा अशीच ओळख आहे. अक्कलकोट येथे नववर्षाचा संकल्प हा उपक्रम मुंबईतील भाविकांनी वीस वर्षापूर्वी सुरू केला. मात्र, या उपक्रमात कोल्हापुरातील भाविकांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत असून त्यालाही आता कोल्हापूरचा सोहळा असेच हळहळू स्वरूप येवू लागले आहे. 

दिवाळीची भिशी 

संसाराचा गाडा हाकत घरातच विविध प्रकारची कामं करायची किंवा अगदी घरेलू कामगार म्हणून चार घरची धुणी-भांडी करणाऱ्या महिला असोत किंवा मजुरीची कामे करणाऱ्या पुरूष मंडळी दिवाळीच्या भिशीच्या माध्यमातून वर्षभर पैसे साठवतात आणि याच पैशातून मग ही मंडळी पुढे पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यांचे हेच पाच ते दहा दिवसांचे पर्यटन पुढे वर्षभर त्यांना सळसळती ऊर्जा देतात. 

भविष्यात विमान प्रवासही घडवू

मरगाई गल्लीतून सौंदत्तीबरोबर इतर ठिकाणी सहलींची संकल्पना आम्ही पुढे आणली. यंदा बेळगाव डेपोच्या "ऐरावत' बसचे बुकींग केले असून सामान्य बाया-बापड्यांनाही "एसी'चा आरामदायी प्रवास घडावा, हाच प्रमुख उद्देश आहे. भविष्यात विमान प्रवास घडवण्याचाही मानस आहे. 
- प्रदीप पाटील 

याच उद्देशाने सहलींचे आयोजन

वर्षभर हाडाची काडं करून राबणाऱ्या सामान्य कुटुंबातील लोकांना अक्कलकोटबरोबरच माफक शुल्कात देशभरातील धार्मिक व विविध पर्यटनस्थळांना वर्षातून किमान एकदा तरी भेट देता यावी, या उद्देशाने या सहलींचे आयोजन होते. त्यामुळे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. 
- महेश मेस्त्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soundatti Yatra By Sleeper Coach