कोरोनाच्या धास्तीमुळे विशेष विमा पॉलिसी जोमात 

जयसिंग कुंभार
Friday, 14 August 2020

कोरोनाच्या धास्तीमुळे सध्या विमा बाजारपेठेत विविध कंपन्यांच्या कोरोना विमा संरक्षण देणाऱ्या विशेष विमा पॉलिसींची मोठी धुम आहे.

सांगली : कोरोनाच्या धास्तीमुळे सध्या विमा बाजारपेठेत विविध कंपन्यांच्या कोरोना विमा संरक्षण देणाऱ्या विशेष विमा पॉलिसींची मोठी धुम आहे. देशातील जवळपास 30 विमा कंपन्यांमध्ये सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा असून साडेचारशे रुपयांपासून आठ हजारांपर्यंत त्यांचे प्रिमियम आहेत. अगदी तीन महिन्यांपासून साडेनऊ महिन्यांपर्यंत कोरोना उपचारासाठी विमा संरक्षण देणाऱ्या या विमा पॉलिसी आहेत. 

विमा कंपन्यांचे नियंत्रण करणाऱ्या "इन्शुरन्स रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया' (आयआरडीएआय) कडून गेल्या महिन्यात कोरोना महामारीत आरोग्य संरक्षण देणाऱ्या कोरोना कवच, कोरोना संरक्षक या विशेष विमा पॉलिसी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. ग्राहकांनी पुर्ण अभ्यास करून या पॉलिसी घ्यायला हव्यात. 

विम्याची मुदत, विमाधारकाचे वय आणि विमा संरक्षण रक्कम यानुसार विमा हप्ता रक्कम बदलते. साधारण साडेचारशे रुपयांपासून नऊ हजारांपर्यंत हप्ते आहेत. याशिवाय साडेतीन, साडेसहा आणि साडेनऊ महिने अशा तीन प्रकारच्या मुदतींमध्ये विमा संरक्षण घेण्याची मुभाही आहे. कोरोना कवच, कोरना रक्षक या नावाने बहुतेक कंपन्यांनी त्यांचे या पॉलिसींचे लॉचिंग केले आहे. 

या सर्व पॉलिसी वैयक्तीक, कुटुंबासाठी, कारखाने-उद्योगांसाठी समुहाने घेता येतात. 18 ते 65 वयोगटातील व्यक्तींना त्या घेता येतात. पती-पत्नी, आई, वडिल, सासू सासरे, आणि 25 वर्षापर्यंतच्या मुलांचा कुटुंब पॉलिसीत समावेश करता येतो. काही कंपन्यांनी पॉलिसी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून संरक्षण देऊ केले आहे. त्यासाठी पाच टक्के जादा प्रिमियम लागू असेल. तर बहुतेक कंपन्यांनी पॉलिसी घेतल्यानंतर 15 दिवसाने विमा संरक्षण दिले आहे. विमा संरक्षणामध्ये दाखल होण्यापूर्वीचे 15 दिवस आणि रुग्णालयातून डिस्चार्जनंतर 30 दिवसांतील औषधोपचाराच्या खर्चाचा परवतावासुध्दा त्यातून दिला जाईल. घरीच उपचार घेतले असतील तर योग्य डॉक्‍टर्संनी दिलेल्या उपचार खर्चाचाही परतावा मिळू शकतो. काही कंपन्यांनी पीपीई किट वगळता सर्व वैद्यकीय खर्च देऊ केला आहे.

तीन ते पाच लाखांपर्यंतचा वैद्यकीय खर्च परताव्यात समाविष्ठ होऊ शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे आपआपल्या परिसरातील कोणत्या चांगल्या कोविड हॉस्पिटलशी या विमा कंपन्या संलग्न आहेत हे पाहून तेथे कॅशलेस उपचाराची सोय आहे का हे पाहून कंपनी निवडणे कधीही सोयिस्कर. त्याबाबत कंपन्याचे नेमके काय निकष-नियम आहेत याचा काटेकोर अभ्यास करणे ही ग्राहकांची वैयक्तीक जबाबदारी आहे. 

गेल्या दहा जुलैपासून आमची कोरोना कवच पॉलिसी लॉंच झाली. 331 रुपयांपासून आमचा प्रिमियम सुरु होतो. कमीत कमी प्रिमियमचे आमच्याकडे चांगले पर्याय आहेत. कोरोनाच्या गृहउपचाराचाही या पॉलिसींमध्ये समावेश आहे.
विनायक काळे, शाखा व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी 

गेल्या 7 ऑगस्टला आमची कोरोना कवच विमा पॉलिसी सुरु झाली. कंपनीशी संलग्न 4 हजार हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस उपचारांची सोय आमच्या पॉलिसीत आहे.'' 
श्रीनिवास वाटवे, प्रशासन अधिकारी, न्यु इंडिया ऍश्‍युरन्स 
............. 
पॉलिसीबाबतचे नियम ग्राहकांनी अभ्यासूनच निर्णय घ्यावेत. प्रत्येक कंपनीच्या नियमांमध्ये सुक्ष्म फरक आहेत. आपली गरज पाहून पर्याय निवडणे योग्य ठरेल.'' 
- मंदार बन्ने, विमा प्रतिनिधी 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special insurance policy in full swing due to corona panic