राखी टपालासाठी पोस्टात विशेष वितरण व्यवस्था 

घनशाम नवाथे
Wednesday, 29 July 2020

सांगली-  परजिल्ह्यात किंवा परराज्यात असलेल्या भावाला यंदा राखी पौर्णिमेला निर्बंधामुळे बहिणीला भेटता येणार नाही. परंतू टपाल विभागाने बहिण-भावाचे अतूट नाते असलेल्या या सणानिमित्त राखी वेळेत पोहोचवण्यासाठी काळजी घेतली आहे. राखी टपालासाठी विशेष वितरण व्यवस्था केली आहे. 

सांगली-  परजिल्ह्यात किंवा परराज्यात असलेल्या भावाला यंदा राखी पौर्णिमेला निर्बंधामुळे बहिणीला भेटता येणार नाही. परंतू टपाल विभागाने बहिण-भावाचे अतूट नाते असलेल्या या सणानिमित्त राखी वेळेत पोहोचवण्यासाठी काळजी घेतली आहे. राखी टपालासाठी विशेष वितरण व्यवस्था केली आहे. 

कोविड 19 आजारामुळे सध्या अनेक निर्बंध आले आहेत. परजिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी परवाना काढावा लागत आहे. अत्यावश्‍यक कारणासाठीच सध्या परवाना दिला जात आहे. अशा काळातच बहिण-भावाचे पवित्र नाते सांगणारा राखी पौर्णिमा हा सण आला आहे. सध्या निर्बंधामुळे परजिल्ह्यात किंवा परराज्यात असलेल्या बहिण-भावांना यंदा राखी पौर्णिमेला प्रत्यक्ष भेटता येणार नाही. त्यामुळे टपाल विभागाने भारतीय संस्कृतीतील या महत्वाच्या उत्सवानिमित्त राखी टपालासाठी विशेष वितरण व्यवस्था केली आहे. 

टपाल विभाग प्रतिवर्षी राखी वितरणासाठी विशेष काळजी घेत असतो. परंतू यंदा कोविड 19 च्या पार्श्‍वभूमीवर बहिण-भावाला प्रत्यक्ष भेटता येणार नसल्यामुळे टपाल विभागाने राखी वितरणासाठी अधिक प्राधान्य दिले आहे. राखी पौर्णिमा सोमवारी 3 ऑगस्ट रोजी आहे. तर 2 ऑगस्टला रविवारी असून देखील सर्व पोस्ट कार्यालयात राखी टपालाची वितरण व्यवस्था केली आहे. टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी सांगली, मिरज, जत, इस्लामपूर आणि तासगाव येथे राखी टपाल सेंटर सुरू केले आहे. 
कोरोनाच्या संकटात प्राधान्यक्रमाने राखी वेळेत पोहोच व्हावी यासाठी "स्पीड पोस्ट' सेवा वापरता येणार आहे. त्यामुळे कठीण काळात राखी भावापर्यंत वेळेत पोहोचेल. त्यासाठी वेळेत बुकिंग करावे असे आवाहन टपाल विभागातर्फे करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special postage arrangements for Rakhi Post