वर्दीवरचे शिंतोडे हेच अधीक्षकांसमोरचे आव्हान; पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात

शैलेश पेटकर
Sunday, 31 January 2021

जिल्हा पोलिस दलाच्या वर्दीवर उडालेले हे काळे शिंतोडे सहजासहजी पुसले जाणार नाहीत. त्यातून पोलिस दलाच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न आहेच, मात्र सर्वसामान्यांच्या सुरक्षित जगण्यासाठी ही प्रकरणे चांगली नाहीत. 

सांगली ः वारणानगरमध्ये नऊ कोटींवर डल्ला मारणारे पोलिस, निष्पापाचा कोठडीत खून करून तो दडपण्यासाठी मृतदेह जाळून टाकण्यापर्यंतची अधिकाऱ्याची मजल, सांगली-कोल्हापूरच्या पोलिसांचे टोलनाक्‍यावरील टोळीयुद्ध, पीआय दर्जाच्या पोलिस दलातीलच महिला अधिकाऱ्याचा खून केल्याच्या आरोपाखाली सहकारी पोलिस निरीक्षकाला झालेली अटक आणि आता वेश्‍यागमनाच्या अड्डयावर खुद्द निरीक्षकच जेरबंद. हे आहेत जिल्हा पोलिस दलातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कारनामे. जिल्हा पोलिस दलाच्या वर्दीवर उडालेले हे काळे शिंतोडे सहजासहजी पुसले जाणार नाहीत. त्यातून पोलिस दलाच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न आहेच, मात्र सर्वसामान्यांच्या सुरक्षित जगण्यासाठी ही प्रकरणे चांगली नाहीत. 

जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख चढताच आहे. एकीकडे खून, खुनी हल्ला, बलात्कार, दरोडा, चोरीसह गंभीर गुन्हे सुरुच असताना त्याचे खापर सर्वस्वी पोलिस दलावर फोडण्याचे काही एक कारण नाही. समाज म्हणून सारेच या गुन्हेगारीचे भागीदार आहेत हे नाकारता येणार नाहीत. मात्र गुन्ह्याचा तपास एवढ्यापुरतेच पोलिसांचे काम नाही तर गुन्हे होणार नाहीत यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याबाबत पोलिसांची सक्रियता महत्त्वाची असते. त्यासाठी पोलिसांचा केवळ धाक महत्त्वाचा नसून त्यामागे नैतिक बळही हवे. मात्र जेव्हा पोलिसच एकापाठोपाठ आरोपांच्या मालिकेत सापडतात तेव्हा हा धाक आणि नैतिक बळही हरवते. त्यातून पोलिस दलाच्या अब्रुचे धिंडवडे निघतात. 

सन 2016 पासून गेल्या चार-पाच वर्षांतील घडामोडींवर नजर टाकली तरी दरवर्षी पोलिसांच्या प्रतिमेवर आघात होणारे प्रकार घडत आहेत. वारणानगर येथील नऊ कोटी रोकड चोरी प्रकरण उघडकीस आले. वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील झुंझार सरनोबत यांच्या बंगल्यात 9 कोटी 18 लाख रोकड चोरीप्रकरणाच्या संशयावरून तत्कालीन सांगली एलसीबीचे निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे, शरद कुरळपकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. खुद्द पोलिसच चोरावर मोर झाल्याने राज्यभरात धिंडवडे निघाले. 

त्यानंतरचे अनिकेत कोथळे हत्या प्रकरण. नोव्हेंबर 2017 मध्ये झालेल्या या प्रकारात उपनिरीक्षक युवराज कामटे यासह पोलिस अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले अशी मंडळी सध्या न्यायालयाचे समोर खेटे घालत आहेत. यात थर्ड डिग्रीमध्ये आरोपीचा मृत्यू हा प्रकार पोलिस दलाला नवा नाही. मात्र पुरावाच नष्ट करण्यासाठी मृतदेहच परस्पर आंबा घाटात नेऊन जाळण्याचा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे. 

एकीकडे समाजात महिला सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर असताना तत्कालीन एलसीसीबीचे निरीक्षक अभय कुरुंदकर यांना सहकारी महिला अधिकारी बेपत्ताप्रकरणी झालेली अटक तर राज्यभर जिल्हा पोलिस दलाचे धिंडवडे काढणारी ठरली. काही महिन्यांपूर्वी महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कारप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यातील संशयित निरीक्षक विपीन हसबनीस याच्यावर दाखल झालेला गुन्हा आणि आता वेश्‍यागमनासाठी ग्राहक म्हणून आलेले आटपाडी पोलिस ठाण्याचा निरीक्षक अरुण देवकर थेट पोलिसांच्या जाळ्यात सापडले. 

या काही ठळक घटना आहे जिथे पोलिस दलच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे ठाकले आहे. त्यातून पोलिस दलाच्या प्रतिमेवर आघात होत आहेत. लोका सांगे ब्रह्मज्ञान... अशी जिल्हा पोलिस दलाची अवस्था झाली आहे. ही प्रतिमा पुढील तीन वर्षांत बदलण्याचे मोठे आव्हान नूतन पोलिस अधीक्षकांसमोर असेल. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spots on uniform is the challenge before the superintendent; The police are in the accused's cage