चकाचक सांगलीचे ध्येय ; 'स्कॉड रिमेन'चा नारा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

हे असतं 'स्कॉड रिमेन'चं पथक. शहरातील स्वच्छताप्रेमी युवकांचा हा चमू आहे.

सांगली : रविवारचा सुट्टीचा दिवस... सकाळी सातची वेळ, लोक निवांतपणे गच्चीत आजूबाजूला व्यायामात, फिरस्तीत दंग असतात आणि अचानकपणे पन्नास शंभर तरुणांचा जथ्था झाडू, खोरे पाट्यांसह दाखल होतो आणि साऱ्या परिसराच्या सफाईच्या कामाला लागतो. हे असतं 'स्कॉड रिमेन'चं पथक. शहरातील स्वच्छताप्रेमी युवकांचा हा चमू आहे. गेल्या 8 मार्चपासून शहरातील विविध भागात त्यांची ही मोहिम सुरु आहे. 

या उपक्रमाबाबत माहिती देताना जुनेदअल्ताफ पठाण म्हणाला, 'गेल्या वर्षी आठ मार्चला सहज माई घाटावर फिरताना तिथली अस्वच्छता पाहून वाईट वाटले. आपण फेसबुकवर लाडक्‍या सांगलीची स्टेटस टाकतो. आयर्विन पुलापासून गणपती मंदिराबद्दल आपल्या अभिमान असतो. मग हा परिसर कायम स्वच्छ रहायला हवा असं वाटलं.

हेही वाचा -  अभियांत्रिकीत प्रात्यक्षिक प्रभावशाली -

सोबतच्या मित्रांसह दुसऱ्या दिवशी 9 मार्चला आम्ही माई घाटावर मोहिम राबवली. पुन्हा तिथंच पुढच्या रविवारी यायचं ठरवलं. त्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकली. चांगला प्रतिसाद मिळाला. मग आम्ही दर रविवारी सांगलीत अन्यत्र ही मोहिम राबवण्याचा निर्णय केला. सर्व मित्रांना त्यासाठी आवाहन केलं. त्यासाठी ग्रुपचं स्कॉड रिमेन्स...(SQUAD REMAINS) असं नामकरण केलं. 

हेतू हा की उपक्रम सतत सुरु रहावा. त्यासाठी ग्रुप कायम रहावा. माई घाटानंतर, सरकारी घाट, हरिपूरचा संगमेश्वर घाट, बापट मळा, विश्रामबाग ब्रिज , राजमती ग्राउंड, विष्णू घाट, राम मंदिर, पुष्पराज चौक. मिरज रस्ता, कर्मवीर चौक, मार्केट यार्ड अशा जागोजागी मोहिम झाली. मोठा प्रतिसाद मिळाला. जवळपास ग्रुपमध्ये 180 जण आले आहेत. स्वच्छ ठिकाण पुन्हा अस्वच्छ व्हायचं. मग पुन्हा तिथं स्वच्छता. हा आमचा सिलसिला सुरुच आहे. 

असं होतं नियोजन 

दर बुधवारी किंवा गुरुवारी समाजमाध्यमांवरून रविवारी कुठं जमायचं हे ठरतं. ग्रुपच्या वर्गणीतून स्वच्छतेच्या सर्व साधने खरेदी केली असून मुलांनी फक्त हातमोजे घेऊन यायचं. संकलित कचरा महापालिकेच्या कचरा कुंडीत टाकला जातो. त्यानंतर तिथं स्वच्छतेबाबत स्थानिकांमध्ये प्रबोधन जागृती केली जाते. कचरा उघड्यावर टाकू नये यासाठी विनंती केली जाते. स्वच्छतेची जागा कोणती निवडायची हे ग्रुप सदस्यांकडून आलेल्या सुचनांमधूनच होते. 

हेही वाचा - जीवाणूमुळे होणाऱ्या व्याधींवर अनेक औषधे उपलब्ध असल्यामुळे ते व्याधी बरे करणे सोपे आहे

 

"टाळेबंदीमुळे थोडी रेंगाळलेली मोहिम आम्ही आता अधिक तंत्रशुध्दपणे राबवणार आहोत. लोकसहभाग वाढावा यासाठी स्थानिकांनी स्वतः नियोजन करून आम्हाला मदतीसाठी बोलवावे. ओला-सुका कचऱ्याचे घरातच विलगीकरण करून कचरा वेचक महिलांकडे तो सोपवावा यासाठी आमचा प्रयत्न असेल.'' 

- जुनेद पठाण 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: squad remains the group of people working for clean sangli as a social work