राष्ट्रवादीचे अखेर ठरलं; उदयनराजेंविरोधात हेच लढणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रिक्त जागेवर होणाऱ्या पोटनिवडणूकित उदयनराजे विरोधात राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असेल याचे तर्कवितर्क वर्तविले जात होते.

सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे नेते व माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून अखेर श्रीनिवास पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून नकार आल्याने राष्ट्रवादीने आज (मंगळवार) निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजे विरुद्ध माजी राज्यपाल अशी लढत पाहायला मिळणार असून गुरुवारी श्रीनिवास पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रिक्त जागेवर होणाऱ्या पोटनिवडणूकित उदयनराजे विरोधात राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असेल याचे तर्कवितर्क वर्तविले जात होते. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सारंग पाटील, सुनील माने, नितीन पाटील यांची नावे पुढे आली. पण सक्षम आणि दमदार उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे होते. मात्र सर्वसमावेशक आणि काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा होणारे उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आग्रही होते. 

अगदी सोनिया गांधी यांच्याकडून चव्हाण यांच्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यांनी कराड दक्षिणच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन चाचपनी केली होती. यामध्ये सर्वांनी कराड दक्षिण मधून लढावे असा सूर निघाला होता. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी काल विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज खरेदी केला. त्यामुळे रात्री उशिरा शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मुळात श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांच्या आदेशाची वाट पाहत होते. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील अशी लढत होणार आहे. श्री. पाटील गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणारआहेत. यावेळी शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Srinivas Patil contest against Udyanraje Bhosale in Satara loksabha bypoll